पुणे | वैद्यकीय शिक्षण, आरोग्य, संशोधन संस्थांमध्ये समन्वय हवा – कानिटकर

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य व संशोधन संस्था यात समन्वय असायला हवा. त्यामुळे आरोग्यविषयक संशोधनात मदत होईल, असे मत महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू लेफ्ट. जन. माधुरी कानिटकर यांनी व्‍यक्‍त केले. भारती विद्यापीठ वैद्यकीय महाविद्यालयातर्फे आयोजित १९ व्या वार्षिक संशोधन परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी त्‍या बोलत होत्‍या.

या वेळी भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. विवेक सावजी, आरोग्य विज्ञान विभागाच्या कार्यकारी संचालिका डॉ. अस्मिता जगताप, प्राचार्य डॉ. मंदार करमरकर, भारती हॉस्पिटलचे वैद्यकीय संचालक डॉ. संजय ललवाणी उपस्थित होते.

कानिटकर म्हणाल्या, आरोग्य क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर अचूक निदान करण्यास उपयुक्त ठरणारा असला, तरी डॉक्टरांनी रुग्णास प्रत्यक्षात पाहणे. त्याला आत्मविश्वास देणे, या गोष्टीला पर्याय असू शकत नाही. व्हर्चुअल रिऍलिटीसारखे आधुनिक तंत्रज्ञान वापरून वैद्यकीय शिक्षण देणाऱ्या प्राध्यापकांनी अनेक विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचले पाहिजे. डॉ. सावजी म्हणाले, येणाऱ्या युगात बायोनिक तंत्रज्ञान वापरल्यास मानवी आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल घडेल. त्या बदलाचा स्वीकार सर्वांनाच करावा लागेल.

या वेळी डॉ. करमरकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाने केलेल्या संशोधनात्मक कार्याचा अहवाल सादर केला. याप्रसंगी डॉ. सविता मेहेंदळे व डॉ. विजया पंडित या ज्येष्ठ डॉक्टरांचा विशेष सन्मान करण्यात आला. डॉ. प्रिसिला जोशी, डॉ. जयश्री गोठणकर, डॉ. मीरा मोडक यांनी आयोजन सचिव म्हणून काम पाहिले.