बेदाणा चाळीसाठी अनुदानाची गरज – शरद पवार

पुणे – राज्यात कांदा साठवणुकीसाठी उभारण्यात आलेल्या कांदा चाळींच्या धरतीवर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बेदाणा साठवणुकीसाठी बेदाणा चाळी उभारण्यासाठी शासनाने अनुदान देण्याची गरज आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले.

महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाच्या वार्षिक अधिवेशनानिमित्त आयोजित द्राक्ष परिषदेच्या उद्‌घाटनप्रसंगी पवार बोलत होते. यावेळी संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार, राज्याचे फलोत्पादन संचालक कैलास मोते, उपाध्यक्ष कैलास भोसले, सुनील पवार, चंद्रकांत लांडगे हे यावेळी उपस्थित होते. यावेळी पवार म्हणाले की, द्राक्षपिकासंदर्भात नवे संशोधन प्रश्‍नांची जाण, संशोधन, उत्पादन, मार्केटिंग आणि शासकीय धोरण याबाबतीत सतत जागृत असणारी शेतकऱ्यांची ही संघटना आहे.

ही संघटना द्राक्ष उत्पादकांचे जीवनमान बदलण्यात यशस्वी झाली आहे. द्राक्ष उत्पादक शेतकरी हा नैसर्गिक आपत्तीला सामोरे जातो त्याला संकटातून बाहेर काढण्यासाठी सरकारने पावले उचलायला हवीत. द्राक्ष बागेवर प्लॅस्टिक आच्छादनासाठी 50 टक्के अनुदान देण्याचा निर्णय घेण्याची गरज आहे.

बेदाणे उत्पादनाकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळतो आहे. अशा वेळी कांदा चाळीच्या धर्तीवर बेदाणा साठवणुकीसाठी बेदाणा चाळीसाठी सरकारने अनुदान देण्याची गरज आहे. प्रतिवर्षी तीन लाख टन बेदाणा उत्पादन होते भारताची बेदाण्याची गरज 50 टक्के देखील आपण पूर्ण करू शकत नाही. याच वेळी अफगाणिस्तानातून बेदाणा आयात करावा लागतो. अशावेळी बेदाण्याची गुणवत्ता सुधारण्यासाठी पुढाकार घेण्याची आवश्‍यकता आहे. त्याचबरोबर बेदाणा निर्यातीसाठी संस्था निर्माण करण्याची अपेक्षा देखील पवार यांनी व्यक्त केली.

सरकारने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहावे

द्राक्ष बागायतदार संघाचे अध्यक्ष शिवाजी पवार म्हणाले, निर्यातक्षम द्राक्षाचे 98 टक्के उत्पादन महाराष्ट्रात होते. जवळपास 2 लाख 63 हजार मॅट्रिक टन द्राक्षाची निर्यात केली जाते यातून देशाला मोठ्या प्रमाणात विदेशी चलन देखील मिळते. त्यामुळे सरकारने संकटाच्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्या पाठीशी राहावे, अशी मागणी केली.