सातारा | मुलांना मैदानी खेळांकडे वळवण्याची गरज

खटाव, (प्रतिनिधी) – सुसंस्कारित पिढ्या घडवण्यासाठी मुलांना मोबाइलपासून दूर ठेवून, मैदानी खेळांकडे वळवणे गरजेचे आहे.विद्यालयाच्या क्रीडांगणाचा विद्यार्थ्यांनी उपयोग करावा, असा सल्ला कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष महेश शिंदे यांनी दिला.

खटाव येथील चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्थेच्या श्री लक्ष्मीनारायण इंग्लिश स्कूलचे स्नेहसंमेलन व वार्षिक पारितोषिक वितरणप्रसंगी ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष अजितराव पाटील, डॉ. सौ. प्रिया शिंदे, सौ. सुषमा पाटील, सरपंच नंदकुमार वायदंडे, संस्थेचे उपाध्यक्ष बापूसाहेब कर्णे, सदस्य विजयकुमार गोडसे, अतुल जोशी, शहाजीराजे महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद येलपले, मुख्याध्यापक एल. डी. पोटफोडे, के. एन. माने, सावित्रीबाई फुले कन्याशाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पुष्पा सवाखंडे, माजी मुख्याध्यापिका सौ. पवार, विसापूरच्या संत गुंडोजीबाबा विद्यालयाचे मुख्याध्यापक गायकवाड, भोसरे येथील हनुमान विद्यालयाचे मुख्याध्यापक दणाणे उपस्थित होते.

ना. शिंदे यांनी पाटील कुटुंबीयांशी असलेला स्नेह, चंद्रहार पाटील आणि या शाळेतील विद्यार्थीदशेतील आठवणी सांगितल्या. डॉ. सौ. शिंदे म्हणाल्या, ज्या विद्यालयात शिक्षण घेतले, तेथे प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रण मिळणे, हा ना. शिंदे यांच्यासाठी अनमोल क्षण आहे. अजितराव पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. ‘चंद्रहार’ या हस्तलिखिताचे प्रकाशन सौ. शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.

शिक्षिका सौ. गवळी व सौ. मोहिते यांचा सन्मान करण्यात आला. धायगुडे यांनी संदेश वाचन, के. एन. माने यांनी अहवाल वाचन, काशीद यांनी क्रीडा अहवाल वाचन केले. सांस्कृतिक विभागप्रमुख सौ. बर्गे व ए. ए. शिंदे यांनी सूत्रसंचालन केले. कुमारी टोणे यांनी आभार मानले. आर. पी. पवार, लावंड, कुंभार, एस. एम. शिंदे, कोरडे, वाघ यांनी कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले.