पश्‍चिम घाटातील वनसंपदेचे जतन करण्याची गरज

वाई : सह्याद्री पर्वतरांगा किंवा पचिम घाट भारताच्या पश्‍चिम समुद्रकिनारपट्टीलगत उभी असलेली डोंगरांची रांग आहे. पचिम घाट हा जगातील सर्वाधिक जैवविविधता असलेल्या आठ वारसास्थळांपैकी एक आहे. सह्याद्रीच्या घाटात वनस्पती, वन्यजीवांच्या असंख्य प्रजाती आढळतात. संपूर्ण भारतात समृद्ध वनसंपदा पश्‍चिम घाटाला लाभली असून या संपदेचे जतन होणे काळाची गरज आहे. निसर्गसंपदेचे नुकसान टाळण्यासाठी प्राण्यांच्या शिकारी व वारंवार लागणारे वणवे रोखण्याची गरज आहे.

सव्वातीनशे प्रजाती नामशेष होण्याच्या मार्गावर
जवळपास 325 प्रजाती नामशेष (लुप्त) होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. पुण्याकडून महाबळेवरला जाताना वाई हे सातारा जिल्ह्यातील निसर्गसंपन्न ठिकाण आहे. वाई तालुक्‍याचे क्षेत्रफळ 619.10 चौरस किमी असून पचिमेकडील भाग जैवविविधतेने नटलेला आहे. तालुक्‍यात अनन्यसाधारण वनसंपदा आहे. तालुक्‍याच्या एकूण क्षेत्रफळापैकी 13 हजार हेक्‍टर वनक्षेत्र आहे.

वाईच्या पचिम भागात दुर्मिळ वन्यप्राणी, पक्षी, वनौषधी, झाडे, वेली, कीटक आढळतात. त्यातील काही वन्यजीव हे फक्‍त पश्‍चिम घाटातच आढळतात. जोर व जांभळी गावांचे वनक्षेत्र हे पर्यटकांचे लक्ष वेधून घेत आहे. पश्‍चिम घाटात अंजनी, जांभुळ, पार जांभुळ, आवळा, बेहडा, हिरडा, फणस, आंबा, उंबर, पिंपरण, पायर, काटेशेवर, हिवर, सीताफळ, पळस, बहावा, कुडा, मोहा, करंज, कडुलिंब, मोगीर, गेळा, बिब्बा, ऐन, चिंच, निरगुडी, कुंभा, नाना, भोमा, पांढरी किंजळ, पांगारा, माकडीण, वारस, दिडा, बकुळ, कडीपत्ता, सालफळ, साग, धावडा, तिवस, करवंद, तांबट, बांबू, चिवा बांबू, भुता, धामण, आसाणा इत्यादी जातीच्या वनस्पती व झाडे आढळतात.

वाईच्या पश्‍चिम भागात बिबट्या, रानकुत्रे, कोल्हा, लांडगा, तरस, खोकड, रानडुक्‍कर, सांबर, अस्वल, शेकरू, साळींदर, खवले मांजर, मुंगूस, भेकर, गवा, वानर, माकड, पिसोरी, कलिंदर, खार, घोरपड, विविध प्रकारचे साप, सरडे, पाली, बेडूक इत्यादी वन्यप्राणी, मोर, रानकोंबडा, स्वर्गीय नर्तक, कोकीळ, घुबड, कोतवाल, हरियाल, धनो, चिमणी, पोपट, खंड्या, हळद्या, सुतार, बुलबुल, भारद्वाज, धोबी, पारवा, साळुंखी, दयाळ, मैना, टिटवी, होला, सर्पगरूड, बहिरी ससाणा, बगळा इत्यादी पक्षी आढळतात.

“वणवामुक्‍त डोंगर’ योजना राबविणार
वन्यप्राण्यांच्या शिकारी रोखण्यासाठी वन विभागाकडून कडक कारवाई केली जात आहे. वणवा लावल्याबद्दल गेल्या वर्षभरात 21 हून अधिक जणांवर कारवाई करण्यात आली होती. तालुक्‍यातील सामाजिक संस्था व वन विभागाच्यावतीने आगामी वर्षात “वणवामुक्‍त डोंगर’ योजना राबविण्याचे नियोजन आहे.
– महेश झांजुर्णे, वनक्षेत्रपाल, वाई.

वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाई हवी
पर्यावरण संवर्धन ही काळाची गरज आहे. वणव्यापासून जंगलांचे व डोंगरांवरील वनस्पती, प्राण्यांचे रक्षण करण्यासाठी सामाजिक संस्था व पर्यावरणप्रेमी नागरिकांचे सदैव सहकार्य असते. वन्यप्राण्यांना हानी पोहोचवणाऱ्यांवर आणि वणवा लावणाऱ्यांवर कडक कारवाई करण्यात यावी.
– प्रशांत डोंगरे, पर्यावरण प्रेमी.

Leave a Comment