NEET परीक्षेत गैरव्यवहार; आप, काँग्रेसची चौकशीची मागणी

नवी दिल्ली  – नीट या वैद्यकीय प्रवेश परिक्षेत झालेल्या गैरव्यवहाराची चौकशी करावी, अशी मागणी कॉंग्रेस व आम आदमी पक्षाने केली आहे. एनईईटी परीक्षेच्या निकालांवरील गदारोळातून विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात आणल्याबद्दल या दोन्ही पक्षांनी केंद्रावर टीका केली आहे.

या परीक्षा घोटाळ्याचे वर्णन करणारा एक व्हिडिओ आम आदमी पक्षाने एक्सवर शेअर केला आहे. त्यात ज्या दिवशी लोकसभेचे निकाल जाहीर झाले त्याच दिवशी नीट परिक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. त्यात एकूण ६७ विद्यार्थ्यांना टॉप रँकिंग देण्यात आले आहे आणि यातील एकाच केंद्रावरील सहा विद्यार्थ्यांना टॉप रँकिंग मिळाले आहे, हा गैरप्रकारच आहे असे विद्यार्थ्यांचेही म्हणणे आहे.

चौथी पास हुकूमशहा विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करण्यात व्यस्त आहे.” अशी कॅप्शनही आम आदमी पक्षाने आपल्या व्हिडीओला दिली आहे. दरम्यान, काँग्रेस नेते आणि जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी स्टुडंट्स युनियन (जेएनयूएसयू) चे माजी अध्यक्ष कन्हैया कुमार यांनी वारंवार पेपर लीक रोखण्यासाठी कठोर कायदा करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

तसेच नीट परिक्षेत झालेल्या गैरव्यवहाराच्या चौकशीचीही मागणी त्यांनी केली आहे. या निकालातील गैरव्यवहारामुळे असंख्य विद्यार्थि हताश झाले आहेत असेही त्यांनी म्हटले आहे.