पुणे | नीट पीजी परीक्षा आता २३ जूनला

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – वैद्यकीय पदव्‍युत्तर अभ्यासक्रमाच्‍या प्रवेशासाठी अनिवार्य असलेल्‍या नीट पीजी परीक्षेच्या वेळापत्रकात बदल करण्यात आला आहे. सुधारित वेळापत्रकानुसार नीट पीजीची परीक्षा २३ जून रोजी होणार आहे. जुन्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा ७ जुलै रोजी होणार होती. या परीक्षेचा निकाल १५ जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे.

पदव्युत्तर वैद्यकीय शिक्षण मंडळ, राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोग, वैद्यकीय समुपदेशन समिती, आरोग्य विज्ञान महासंचालनालय आणि वैद्यकीय विज्ञानांसाठी राष्ट्रीय परीक्षा मंडळांनी घेतलेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. नव्या वेळापत्रकानुसार नीटी पीजी २०२४ च्या प्रवेशासाठी समुपदेशन फेरी ५ ऑगस्ट ते १५ ऑक्टोबरपर्यंत राबविण्यात येणार आहे.

पात्रतेसाठी कट ऑफची तारीख १५ ऑगस्ट २०२४ असेल. नवीन शैक्षणिक सत्र १६ सप्टेंबरपासून सुरू होणार आहे, तसेच महाविद्यालयात रूजू होण्याची शेवटची तारीख २१ ऑक्टोबर आहे. नीट पीजी २०२४ ची परीक्षा प्रथम ३ मार्च रोजी घेण्यात येईल, असे जाहीर करण्यात आले होते. त्यानंतर परीक्षा ७ जुलै रोजीपर्यंत पुढे ढकलण्यात आली होती. मात्र, आता पुन्हा परीक्षेच्या तारखेमध्ये बदल करण्यात आला आहे.