नगरपालिका प्रशासनासह पदाधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

श्रीगोंदा शहरात मोकाट जनावरांचा वाढता उपद्रव

श्रीगोंदा – श्रीगोंदा शहरात सध्या मोकाट जनावरांची संख्या कमालीची वाढली असून शहरातील प्रमुख रस्त्यांसह गल्लीबोळात जनावरांनी रस्ते “जॅम’ केल्याचे चित्र पहायला मिळत आहे. मोकाट जनावरांच्या कळपांमुळे शहराच्या वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे, शहरवासीयांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून शहरात पाळीव मोकाट जनावरांचा शहरात त्रास वाढला आहे. नगरपालिका प्रशासनाकडून मात्र कारवाई होताना दिसत नाही. शहरातील प्रमुख आणि अंतर्गत रस्त्यांवर मोकाट जनावरांचे कळप बसून राहत असल्याने वाहनचालकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे अनेकदा अपघात होतात. जनावरांचे मालक सकाळच्यावेळी त्यांना मोकळे सोडून देतात. त्यांना पकडण्यासाठी मात्र नगरपालिका प्रशासन कोणतीही हालचाल करीत नाही. त्यामुळे या अगदी किरकोळ वाटणाऱ्या पण गंभीर समस्येपासून सुटका काही होत नाही.

पावसाळ्याच्या दिवसात मोठ्या प्रमाणात मोकाट जनावरे रस्त्यांवर येण्यास अनेक मतप्रवाह आहे. काहींच्या मते गोठ्यात पावसाळ्यात चिखल आणि माश्‍यांचा त्रास होत असल्याने ते रस्त्यांवर ठाण मांडतात. मात्र, गेल्या काही दिवसात पाऊस नाही तरीही जनावरे रस्त्यावर बसलेली दिसतात. शहरातील शनी चौक, आठवडा बाजार आदी भागात जनावरांचा सुळसुळाट असतो. याचे परिणाम वाहनचालकांना भोगावे लागत आहेत. श्रीगोंदा शहरातील अनेक रस्त्यांची आधीच दुरवस्था झालेली असताना त्यावर ठिकठिकाणी मोकाट जनावरांच्या वावराने शहरवासीयांसह वाटसरूंना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगरपालिका प्रशासनाने याकडे गांभीर्याने बघून कारवाई करणे गरजेचे बनले आहे.

Leave a Comment