पुणे | आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्याचे घर फोडले

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – आर्थिक चणचण आणि आईच्या शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या पैशांसाठी एकाने शेजाऱ्याचे बंद घर फोडून दागिने आणि रोकड चोरल्याचा प्रकार घडला. याप्रकरणी चोरट्याला बिबवेवाडी पोलिसांकडून अटक करण्यात आली असून, त्याच्याकडून सव्वासात लाख रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.

दीपक नामदेव पाटोळे (४१) असे अटक करण्यात आलेल्या चोरट्याचे नाव आहे. याप्रकरणी बिबवेवाडी पोलिसांत गुन्हा करण्यात आला होता. दीपक बेरोजगार आहे. तो आणि त्याची वृद्ध आई बिबवेवाडीतील एका सोसायटीत राहायला आहेत. मागील काही महिन्यांपासून त्याची आर्थिक चणचण सुरू होती.

आई आजारी असल्याने डाॅक्टरांनी शस्त्रक्रिया करण्यास सांगितले होते. मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात दीपकने शेजाऱ्यांच्या बंद सदनिकेचे कुलूप तोडून दागिने आणि रोकड चोरली होती. शेजारी मूळगावी सोलापूरला गेले होते. गावाहून परत आल्यानंतर घरफोडीचा प्रकार उघडकीस आला.

गुन्हा दाखल झाल्यावर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासासाठी ताब्यात घेतले होते. गेले सहा महिने गुन्ह्याचा छडा लागला नव्हता. अखेर तपासात मिळालेल्या माहितीनुसार शेजारी दीपक पाटोळेने शेजाऱ्यांच्या घरात चोरी केल्याचे उघडकीस आले. पाेलिसांनी त्याला ताब्यात घेतले. तेव्हा त्याने घरफोडीची कबुली दिली.

बिबवेवाडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक प्रवीण काळुखे, संतोष जाधव, विशाल जाधव, आशिष गायकवाड, शिवाजी येवले, प्रणय पाटील, ज्योतिष काळे, अभिषेक धुमाळ यांनी ही कामगिरी केली.

असा लागला गुन्ह्याचा छडा
आरोपी दीपक पाटोळेने आईच्या शस्त्रक्रियेसाठी शेजाऱ्यांच्या घरातून सव्वासात लाख रुपयांचा ऐवज चोरला. ऐवज विक्रीनंतर आईची शस्त्रक्रिया केली आणि उरलेल्या पैशांतून त्याने स्वत:साठी नवीन मोबाइल आणि टीव्ही खरेदी केला. दीपकच्या राहणीमानात अचानक बदल झाल्याची पोलिसांना माहिती मिळाल्यानंतर त्याच्यावरचा संशय बळावला. चौकशीसाठी त्याला ताब्यात घेण्यात आले. तेव्हा त्याने घरफोडीची कबुली दिली.