नेपाळ 10 वर्षांसाठी भारताला पुरवणार वीज

काठमांडू  – नेपाळकडून भारताला निर्यात केल्या जाणाऱ्या विजेचे प्रमाण वाढवण्याबद्दल नेपाळ सरकार विचार करत असल्याचे नेपाळचे पंतप्रधान पुष्प कमल दहाल प्रचंड यांनी सांगितले आहे. नेपाळकडून भारताला 450 मेगावॅट वीजपुरवठा केला जातो आहे.

हे प्रमाण पुढील 10 वर्षांमध्ये 10 हजार मेगावॅटपर्यंत वाढवले जाईल. दोन्ही देशांमध्ये या संदर्भातील द्विपक्षीय प्राथमिक करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या असल्याचेही प्रचंड यांनी सांगितले. नेपाळ विद्युत प्राधिकरणाच्या 38 व्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही माहिती दिली.

जलविद्युत क्षेत्रामध्ये नेपाळकडून परिवर्तन केले जाते आहे. या क्षेत्रामध्ये परदेशी गुंतवणुकीला आकर्षित करण्यासाठी पोषक वातावरण निर्माण केले जात असल्याचेही त्यांनी सांगितले. हरित उर्जेच्या वापरासाठी आणि निर्मितीसाठी धोरण निश्‍चित करण्याचा विचारदेखील नेपाळकडून केला जात असल्याचे प्रचंड यांनी सांगितले.