नेवासा: दारुबंदी ठरावाच्या ग्रामसभेत बियरबार चालकांची महिलांना अरेरावी; आक्रमक महिलांनी गाठले पोलिस ठाणे

नेवासा – भारतीय प्रजासत्ताक दिनी शुक्रवार (दि.१४) रोजी सकाळी १० वाजता मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील ग्रामसभेत महीलांनी आक्रमक पवित्रा घेत दारु बंदीची एकमुखी मागणी केली. या झालेल्या ग्रामसभेत सर्वानुमते या ठरावावर उपस्थित महिला – पुरुष व युवकांनी एकमत दाखवत ठराव संमत करण्याची मागणी केली. मात्र या ग्रामसभेलाच उपस्थित असलेल्या काही चक्क हॉटेल व्यावसायिकांनीच आमच्या जीवावर लोक पोट भरतात, तुमचे नवरे ताब्यात ठेवा असे, भर ग्रामसभेत काही महिलांना व्यावसायिकांनी खडसावल्यामुळे महिलांचा चांगलाच पारा चढला व या झालेल्या शब्दांच्या भडीमारामुळे ग्रामसभेत चांगलाच गदारोळ उडाला. महिलांना भर ग्रामसभेत अरेरावी झाल्यामुळे आक्रमक महिलांनी थेट नेवासा पोलीस ठाण्यात धाव घेतली.

याबाबत अधिक सविस्तर वृत्त असे की, मुकिंदपूर (नेवासा फाटा) येथील ग्रामपंचायत कार्यालयात सन २०१४ मध्ये महिलांची विशेष ग्रामसभा घेवून उभी बाटली आडवी केलेली होती. त्यानंतर ग्रामपंचायतीने या ठरावाची दखल घेतली नसल्यामुळे पुन्हा या ठरावाची दखल घेवून विद्यमान ग्रामपंचायत सदस्य अमोल घुले यांनी दारुबंदीसाठी ग्रामपंचायत कार्यालयात निवेदन दिलेले होते. खेळीमेळीत सुरु झालेली ही ग्रामसभा दारु बंदीचा विषय ऐरणीवर आल्यानंतर महिलांनी आक्रमक पावित्रा घेत गावात दारुबंदी करा अशी जोरदार एकमुखी मागणी केली. यावेळी या ग्रामसभेला उपस्थित असलेल्या काही व्यावसायिकांनी भरग्रामसभेत महीलांना अरेरावीची भाषा वापरल्यामुळे ग्रामसभेतून थेट महिला नेवासा पोलीस ठाण्यात दाखल झाल्या. पोलीस निरिक्षक धनंजय जाधव यांनी रितसर फिर्याद घेण्याचे आश्वासन दिल्यानंतर उपस्थित महिलांना पोलीस निरीक्षक जाधव यांनी शांत केले.

ग्रामसभेत उपस्थित असलेल्या महिला – पुरुषांनी एकमताने दारुबंदीची मागणी केली. मात्र या ग्रामसभेला काही बियरबार चालकच उपस्थित राहून महिलांनी केलेल्या मागणीला विरोध केल्यामुळे महिलांनी ग्रामसभेत आक्रमक पावित्रा घेवून चांगलाच गदारोळ झाला यावेळी सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांच्या उपस्थितीत अॅड. अशोक कर्डक, प्रविण साळवे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष पत्रकार राजेंद्र वाघमारे, पप्पू इंगळे, माजी सरपंच अशोक उपळकर, महेश निपुंगे, राजू साळवे, दत्ता उपळकर, प्रताप हांडे यांनी मध्यस्थीची भूमिका घेवून राडा मिटविण्याचा यशस्वी प्रयत्न केला असला तरी पुन्हा दारुबंदी विषयावर नेवासा फाटा येथील महिला आक्रमक झाल्यामुळे राडा पुन्हा पेटण्याची चिन्हे निर्माण झाली असल्याचे दिसून येत आहे. एकिकडे दारुबंदीच्या ठरावाला ग्रामसभेत एकमत झालेले असल्यामुळे व्यावसायिकांनी या ठरावाला विरोध केल्यामुळे महिला प्रचंड आक्रमक झालेल्या दिसून आल्या.