नेवासा: विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या प्राध्यापकाला जमावाकडून बेदम ‘चोप’

नेवासा – विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठविणाऱ्या प्राध्यापकाला जमावाने चांगलाच चोप दिला. ही घटना नेवासा (Nevasa) तालुक्यातील घडली आहे. इयत्ता बारावीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थीनीला प्राध्यापकाने व्हाट्सअपवर अश्लील मेसेज पाठिवले होते. ही घटना उघडकीस आल्यानंतर संतप्त जमावाने संबंधित प्राध्यापकाला चांगलाच चोप दिला. या घटनेची माहिती परिसरात पसरताच प्राध्यापकाच्या अशा वर्तनाबद्दल संताप व्यक्त केला जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित प्राध्यापकावर महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना शिस्त लावण्याची जबाबदारी सोपवली होती. मात्र तो प्राध्यापक शिस्त न लावता उलट विद्यार्थीनींचे मोबाईल नंबरवर अश्लील मेसेज पाठवित असल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेप्रकरणी विद्यार्थीनीच्या पालकांनी महाविद्यालयाचे प्राचार्य यांना एका निवेदनाद्वारे हा प्रकार सांगितला आहे.

दरम्यान, नेवासा (nevasa) तालुक्यातील एका महाविद्यालयातील प्राचार्यांचे एका महिलेसोबत आक्षेपार्ह अवस्थेतील छायाचित्र सोशल मीडियावर प्रसारित झाल्याची चर्चा काही महिन्यांपूर्वी रंगली होती. अशातच आता पुन्हा एकदा एका प्राध्यापकाने विद्यार्थीनीला अश्लील मेसेज पाठविल्याने शिक्षकांच्या वर्तनाबद्दल विद्यार्थ्यांच्या पालकांमध्ये संतापाची लाट आहे.