पुणे | पोलीस आयुक्तालयासाठी लवकरच नवीन इमारत

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – पुणे पोलीस आयुक्त कार्यालयासाठी नवीन सुसज्ज अत्याधुनिक अशी इमारत उभारणीसाठीचा मार्ग मोकळा झाला आहे. शनिवारी (दि.१६) गृह विभागाने १९३ कोटी ८० लाख ५९ हजार रुपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता दिली. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून हे काम केले जावे, असेही यात म्हटले आहे.

शहराचा वाढलेला विस्तार, पोलीस ठाण्यांची वाढलेली संख्या आणि कामाचा भार, यामुळे पुणे पोलीस आयुक्तालयासाठी सध्याची इमारत अपुरी पडू लागली आहे. त्यामुळे पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या धर्तीवर अत्याधुनिक असे नवीन आयुक्तालय इमारत उभारण्याचा प्रस्ताव होता. यासाठी मागील अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरू होता.

पोलीस महासंचालक कार्यालयाने या इमारतीच्या बांधकामासाठी २४२ कोटी ९९ लाख ९१ हजार ११५ इतक्या रकमेचे अंदाजपत्रक प्रशासकीय मान्यतेसाठी सादर केले होते. या पार्श्वभूमीवर मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखालील उच्चाधिकार समितीच्या बैठकीत १९३ कोटी ८० लाख ५९ हजार इतक्या खर्चाच्या अंदाजास मान्यता प्रदान करण्यात आली आहे.

जेथे इमारत उभी करायची आहे, तो भूखंड गृह (पोलीस) विभाग, महाराष्ट्र शासन, यांच्या नावे आहे, याबाबत खात्री केल्यावरच काम सुरू करावे. कामाच्या निविदा मागविण्याच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सक्षम प्राधिकाऱ्ंयाची तांत्रिक मंजुरी घेणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष निधी उपलब्ध झाल्याशिवाय काम सुरू करण्यात येऊ नये, अशा अटींचा यामध्ये समावेश आहे.