Indapur: अमित भाईंचा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला मी अनुभवलाय – अजित पवार

इंदापूर – नॅशनल फेडरेशनची निवडणूक झाली. देशातील संपूर्ण सहकारी साखर कारखान्यांचा अध्यक्ष याला नॅशनल फेडरेशन म्हणतात. याची जबाबदारी अमित भाईंनी, हर्षवर्धन पाटलांवर टाकायची ठरवले. वास्तविक जे प्रकाश दांडेकर मागच्या वर्षीचे अध्यक्ष महाराष्ट्राचे होते. सहसा एकदा एका राज्याचा अध्यक्ष केल्यानंतर, दुसऱ्या राज्याला संधी मिळते. परंतु अमित भाईंचा विश्वास हर्षवर्धन पाटलांनी संपादन केलेला मी अनुभवला आहे, असे गौरवोद्गार राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल काढले.

इंदापूर शहरात भारतीय जनता पार्टीच्या वतीने बारामती लोकसभा मतदार संघाच्या महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रचारार्थ भाजप कार्यकर्ता पदाधिकारी बैठक राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार व भाजप नेते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार बोलत होते.

उमेदवार सुनेत्रा पवार, भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अंकिता पाटील ठाकरे, राजवर्धन पाटील यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे प्रमुख पदाधिकारी व विविध संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुढे मार्गदर्शन करताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, ज्या कालावधीत हर्षवर्धन पाटील सहकार मंत्री होते. मी ही मंत्री होतो. साखर धंद्याच्या संदर्भात पी. चिदंबरम यांना अनेक वेळा दिल्लीला भेटलो. प्रणव मुखर्जींना देखील भेटलो. जे जे देशाचे अर्थमंत्री असायचे त्यांना भेटायचं, चर्चा करायची, तरीदेखील तोडगा निघत नसायचा. समस्येची टांगती तलवार तशीच राहायची. परंतु उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील त्यांनी दिल्लीला जाऊन अमित भाईंना ही केस समजून सांगितली.

या गोष्टीचा अमित भाई शहा यांनी अभ्यास केला. तशा पद्धतीने आपले दहा हजार कोटीचे मुद्दल व पंधरा कोटीचे व्याज, एफ. आर. पी. मध्ये जो भाव दिलेला होता याध्ये इन्कम टॅक्सने ज्या तुटी काढल्या होत्या त्या सर्व माफ केल्या. देशाच्या साखर कारखान्याच्या डोक्यावरील बोजा अमित भाईंनी काढला. त्यामुळेच साखर धंदा टिकला आहे, अशी माहिती अजित पवार यांनी दिली.

अजित पवारांचा शब्द इंदापुरात महायुतीचा धर्म पाळणार, असे हर्षवर्धन पाटलांच्या समोर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. लोकसभा निवडणूक झाल्यानंतर जी विधानसभा निवडणूक होणार आहे यासाठी जो आम्ही निर्णय घेऊ तो निर्णय सर्वांनी मान्य करायचा आहे, असे ठरले आहे, असेही दिलखुलासपणे अजित पवार यांनी कबूल केले.

यावेळी माजी मंत्री हर्षवर्धन पाटील अंकिता ठाकरे, निरा भिमा काखान्याचे चेअरमन लालासाहेब पवार, भाजप तालुका अध्यक्ष शरद जामदार ह. भ. प. बाबा महाराज खारतोडे, यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.