जुन्नर तालुक्यातील द्राक्ष उत्पादकांची गोडी छाटणी झाली कडू 

जुन्नर – गेल्या तीन वर्षापासून निसर्गाच्या लहरीपणामुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडला आहे. द्राक्ष बागेमध्ये एप्रिल छाटणीनंतर मालकाडी तयार होत असताना अचानकपणे २९ एप्रिल रोजी झालेली गारपीट द्राक्षबागायतदारासाठी घातक ठरली असून, त्याचे दुष्परिणाम आत्ताच्या ऑक्टोबर छाटणी मध्ये दिसून आले आहेत.

एप्रिल महिन्याच्या सुरुवातीला द्राक्ष उत्पादक खरड छाटणी करत असतात. त्यानंतर एप्रिल ते जून या तीन महिन्याच्या काळात मालकाडी तयार केली जाते. याच काळात काडीमध्ये घडनिर्मिती होत असते. परंतु याच काळात दिनांक २९ एप्रिल रोजी झालेली गारपीट व त्यामुळे काडीला झालेल्या जखमा या कारणाने घडनिर्मिती होऊ शकली नाही. आणि त्याचा प्रत्यय ऑक्टोबर छाटणी मध्ये पाहायला मिळाला आहे. तालुक्‍यातील ज्या भागात गारपीट झाली, त्या भागात घड निर्मिती होऊ शकली नाही. त्यामुळे वर्षभर संपूर्ण खर्च करून सुद्धा द्राक्ष उत्पादकांचा भ्रमनिरास झाला आहे.

जुन्नर तालुक्यातील गोळेगाव , राजुरी, पिंपळवंडी, गुंजाळवाडी, नारायणगाव या भागात द्राक्षाचे मोठे क्षेत्र असून घडनिर्मितीचे प्रमाण कमी असण्याबरोबरच यंदा डावणी या रोगाचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे. मागील तीन वर्षातील अतिवृष्टी , निसर्ग चक्रीवादळ आणि लॉक डाऊन या संकटातून कुठे सावरतो न सावरतो तोच आता यावर्षी देखील गारपिटीच्या या संकटामुळे झालेल्या नुकसानीमूळे शेतकरी आता पूर्णपणे मेटाकुटीला आला आहे .द्राक्ष पिकासाठी घेतलेले दीर्घ मुदत कर्ज तसेच पीक कर्ज कसे भरायचे याच विवंचनेत सध्या शेतकरी आहेत.

शासनाने त्वरित या द्राक्षबागांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव मदत करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघाचे संचालक जितेंद्र बिडवई यांनी केली आहे.