Parliament Monsoon Session : राज्यसभेतून विरोधकांनी केला सभात्याग

नवी दिल्ली – अध्यक्षांनी कामकाजाच्या निलंबनाची सूचना मान्य न केल्याने आणि मणिपूरच्या मुद्द्यावर चर्चा न केल्याने बुधवारी विरोधकांनी राज्यसभेतून सभात्याग केला. राज्यसभेत आज कागदपत्रे पटलावर ठेवण्याचे कामकाज झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखर म्हणाले की त्यांना राज्यसभेच्या नियम 267 अंतर्गत मणिपूरच्या विषयावर चर्चा करावी, अशी मागणी करणाऱ्या 58 नोटिसा मिळाल्या आहेत.

पण या नोटिसा स्वीकारण्यात येणार नाहीत त्यामुळे त्या फेटाळल्या गेल्या आहेत, असे अध्यक्ष धनखर यांनी नमूद करताच विरोधी सदस्यांनी त्यावर जोरदार संताप व्यक्‍त करीत सभात्याग केला. राज्यसभेत मणिपूरच्या विषयावर कलम 267 अंतर्गत चर्चा करावी, अशी विरोधकांची मागणी आहे आणि त्यासाठी कामकाज सुरू झाल्यापासून रोजच विरोधी सदस्यांकडून अध्यक्षांकडे या प्रस्तावाच्या नोटिसा सादर केल्या जात आहेत. पण दरररोजच त्या फेटाळल्या जात आहेत. आज पुन्हा त्या प्रकाराची पुनरावृत्ती झाली.