Lok Sabha Result 2024: विरोधकांची “इंडिया’ आघाडी घडवणार ‘चमत्कार’?

नवी दिल्ली  – संपूर्ण देशाचे लक्ष लागलेल्या लोकसभा निवडणुकीचा निकाल उद्या (मंगळवार) जाहीर होणार आहे. त्यामुळे राजकीय महासंग्राम म्हणून पाहिल्या गेलेल्या निवडणुकीत कोण बाजी मारणार याविषयीचा फैसला होईल. भाजपच्या नेतृत्वाखालील आघाडीने (एनडीए) सत्ता कायम राखल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची हॅट्‌ट्रिक होईल. त्यामुळे सलग तिसऱ्या निवडणुकीत विजय मिळवण्याच्या देशाचे पहिले पंतप्रधान पं.जवाहरलाल नेहरू यांच्या विक्रमाशी मोदी बरोबरी करू शकतील. ती किमया मोदी साधणार की विरोधकांची इंडिया आघाडी चमत्कार घडवणार याबाबतची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे.

लोकसभा निवडणुकीतील मतदानाची मॅरेथॉन प्रक्रिया १ जूनला समाप्त झाली. ती प्रक्रिया संपताच मतदानोत्तर चाचण्यांचे (एक्झिट पोल) निष्कर्ष जाहीर झाले. बहुतांश चाचण्यांनी मोदींची हॅट्‌ट्रिक होणार असल्याचा अंदाज वर्तवला आहे. मागील २ निवडणुकांपेक्षाही अधिक यश भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला मिळणार असल्याचे त्यांचे भाकीत आहे. अर्थात, इंडिया आघाडीने चाचण्यांचा अंदाज फेटाळून लावला आहे. यावेळी सत्ताबदलाचा विश्‍वास इंडियाकडून व्यक्त केला जात आहे. त्यामुळे चाचण्यांचे भाकीत खरे ठरणार का ते प्रत्यक्ष निकालातून स्पष्ट होईल.

लोकसभेच्या एकूण ५४३ जागा आहेत. बहुमताचा जादुई आकडा २७२ आहे. तो गाठणारी किंवा पार करणारी आघाडी केंद्रात सरकार स्थापन करेल. केंद्रात कुणाची सत्ता याचे उत्तर उद्याच्या निकालामुळे मिळेल. तो निकाल केंद्रातील सत्ताधारी ठरवणारा असला तरी त्याचे परिणाम आगामी काळात राज्याराज्यांत पाहावयास मिळतील. त्या निकालावर अनेक प्रादेशिक पक्षांचे आणि त्यांच्या नेत्यांचे भवितव्य अवलंबून आहे. साहजिकच, लोकसभा निवडणुकीचा निकाल देशभरातील राजकीय समीकरणे प्रभावित करणारा ठरेल.

आंध, ओडिशात कुणाची सत्ता?
आंध्रप्रदेश आणि ओडिशा या राज्यांत लोकसभेबरोबरच विधानसभा निवडणुका झाल्या. त्या राज्यांत कुणाची सत्ता येणार हेही मंगळवारी समोर येईल. निवडणुकांआधी ओडिशात बिजू जनता दलाची, तर आंध्रात वायएसआर कॉंग्रेस पक्षाची सत्ता होती.