‘मोबाईल रिचार्ज’चे दर वाढणार

नवी दिल्ली – कमी दरात मोबाईल सेवा देणे परवडत नसल्यामुळे नोव्हेंबर 2021 मध्ये मोबाईल कंपन्यांनी आपल्या सेवाचे दर 18 ते 25 टक्‍क्‍यांनी वाढविले होते. यात 2022 मध्ये आणखी वाढ होण्याची शक्‍यता असल्याचे वातावरण निर्माण झाले आहे. याअगोदर मोबाईल सेवाचे दर वाढविण्यासाठी एअरटेल कंपनीने पुढाकार घेतला होता.

आता आम्ही पुन्हा मोबाईल सेवाचे दर वाढविण्यासाठी कचरणार नाही असे एअरटेल कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. सध्या मोबाईल सेवाचा दरडोई महसूल 163 रुपये आहे. तो 200 रुपयापर्यंत वाढविण्याशिवाय पर्याय नाही, असे एअरटेल कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक गोपाळ विठ्ठल यांनी सांगितले.

ते म्हणाले की, तीन -चार महिन्यापूर्वी आम्ही मोबाईल सेवाचे दर वाढविले होते. आता आणखी सेवाचे दर वाढविण्याची गरज भासल्यास आम्ही पुढाकार घेऊ. डिसेंबरअखेरच्या दुसऱ्या तिमाहीत एअरटेल कंपनीचा नफा 2.8 टक्‍क्‍यांनी कमी होऊन 830 कोटी रुपये इतका झाला आहे. गेल्या वर्षी तिसऱ्या तिमाहीत या कंपनीला 854 कोटी रुपयांचा नफा झाला होता.