पुणे : दरोड्याच्या गुन्ह्यातील सहा आरोपींना “मोक्का’नुसार आठ वर्षे सक्तमजुरी

पुणे – सशस्त्र दरोडा टाकणाऱ्या सहा जणांना महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोक्का) न्यायालयाने आठ वर्षे सक्तमजुरी आणि प्रत्येकी दहा लाख दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

दंड न भरल्यास अतिरिक्त एक वर्ष कारावास भोगावा लागेल, असेही मोक्काचे विशेष न्यायाधीश ए.वाय.थत्ते यांनी आदेशात म्हटले आहे. हा गुन्हा गंभीर स्वरूपाचा आहे. अधिकाधिक शिक्षा देण्याची मागणी मोक्काचे विशेष सरकारी वकील ऍड. विजय फरगडे यांनी केली.

अर्जुन सिताराम हिलम (वय 24) , मनोहर सीताराम हिलम (वय 22, दोघेही, रा. मुंढावरे, ता. मावळ), बाबू कान्हू वाघमार (वय 25, रा. पाथरगाव, ता. मावळ), विष्णू जनकु वाघमारे (वय 29), नारायण भागा जाधव (वय 21, दोघेही, रा. , फांगणे, ता. मावळ), शांताराम बाळू मुकणे (वय 35, रा. चांभरली, मोहपाडा, ता. खालापूर, जि. रायगड) अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहे.

याबाबत 37 वर्षीय अहिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार वडगाव मावळ पोलिसात दरोडा, मोक्कानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. ही घटना 16 जून 2014 रोजी घडली. फिर्यादी ताजे गावचे हद्दीत कार गाडी उभा करून थांबले होते. त्यावेळी लोखंडी रॉडने मारहाण करून 75 हजार रुपये किंमतीची रोख रक्कम लांबविण्यात आली होती.

सातारा येथे सध्या कार्यरत असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एस. निंबाळकर, लोणावळा विभागाचे पोलीस उपअधीक्षक वैभव कलबुर्मे, वडगाव मावळ पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी या प्रकरणाचा तपास केला. न्यायालयीन कामकाजासाठी कोर्ट अंमलदार गणेश धनवे आणि ललिता कानवडे यांनी मदत केली. सरकारी वकील ऍड. विजय फरगडे यांनी 14 साक्षीदार तपासले.

गुन्ह्यात लांबवलेल्या रक्कमेची जप्ती आणि ओळख परेड महत्त्वाची ठरली. न्यायालयाने कलम 395 (दरोडा) नुसार दोषी धरुन त्यांना प्रत्येकी आठ वर्ष कारावास आणि दोन हजार रुपये दंड, तर मोक्का कलम 3 (1) मध्ये दोषी धरुन प्रत्येकी आठ वर्ष कैद, पाच लाख रुपये दंड, मोक्का कलम 3 (4) नुसार दोषी धरुन प्रत्येकी आठ वर्ष कैद आणि पाच लाख रुपये दंड अशी शिक्षा दिलेली आहे.

Leave a Comment