काॅंग्रेस नेत्यांची बैठक संपन्न; राहुल गांधीच होणार पक्षाध्यक्ष?

नवी दिल्ली – कॉंग्रेस नेत्यांच्या आज झालेल्या बैठकीत कॉंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पक्षाच्या इच्छेनुसार काम करण्याची आपली तयारी आहे असे म्हटले आहे. त्यांच्या या घोषणेचे आजच्या बैठकीत सर्वच उपस्थितांनी जोरदार प्रतिसाद देत स्वागत केले आहे.

या वक्तव्याद्वारे राहुल गांधी यांनी पुन्हा पक्षाध्यक्षद स्वीकारण्याचे संकेत दिल्याचे मानले जात असून नवीन वर्षाच्या सुरूवातीला कॉंग्रेसला त्यांच्या रूपाने नवीन कॉंग्रेस अध्यक्ष मिळणार आहे असे सांगितले जाते.

सन 2019 च्या लोकसभा निवडणुकीत कॉंग्रेसचा पराभव झाल्यानंतर त्याची नैतिक जबबादारी स्वीकारून राहुल गांधी यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता. मधल्या काळात त्यांनी सतत अध्यक्षपद नाकारल्याने हंगामी अध्यक्षपदाची जबाबदारी सोनिया गांधी यांच्यावर पडली होती.

तथापि सोनिया गांधी या त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यतेच्या कारणामुळे फारशा सक्रिय नव्हत्या. कॉंग्रेसवर सतत पराभवाची नामुष्की येत असताना पक्षाला पुर्ण वेळ सक्रिय अध्यक्ष नसणे ही हितावह बाब नाहीं असा मुद्दा उपस्थित करीत पक्षाच्या 23 ज्येष्ठ नेत्यांनी पक्षाला त्वरीत नवीन अध्यक्ष नेमा अशी मागणी केली होती.

या 23 नेत्यांशी चर्चा करण्यासाठी आज सोनिया गांधी यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीतच राहुल गांधी यांनी ही तयारी दर्शवली आहे. सोनिया गांधी यांच्या 10 जनपथ या निवासस्थानी ही बैठक झाली. ती सुमारे सात तास चालली. त्याच बरेच मंथन झाले. त्यात मनोगत व्यक्त करताना सुरूवातीलाच राहुल गांधी यांनी स्पष्ट केले की पक्षाचे नेते जे ठरवतील त्यानुसार काम करण्याची व पक्ष बळकट करण्याची आपली तयारी आहे.

पक्षात सुसंवाद वाढवण्याची व बुथ लेवलवर पक्ष मजबूत करण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. पक्षातील कथित नेत्यांनीही त्यांना समर्थन दिले अशी माहिती कॉंग्रेस नेते पवनकुमार बंन्सल यांनी दिली. पक्षातील 99.99 टक्के नेते राहुल गांधी हे अध्यक्ष व्हावेत या मताचे आहेत असे प्रतिपादन पक्षाचे प्रवक्ते रणदीप सुर्जेवाला यांनी कालच केले होते.

बन्सल म्हणाले की पक्षात अजून येत्या दहा दिवसांत अजून अनेक बैठका होणार असून त्यातील ही पहिली बैठक होती. प्रियांका गांधी याही या बैठकीला उपस्थित होत्या. सोनिया गांधी यांनी यावेळी बोलताना सगळ्यांनी एकदिलाने काम करण्याचे आवाहन केले.

पक्षात नाराज किंवा बंडखोर असा गटच अस्तित्वात नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. ही बैठक घडवून आणण्यासाठी मध्यप्रदेशतील ज्येष्ठ नेते कमलनाथ यांनी पुढाकार घेतला होता. यावेळी आनंद शर्मा, गुलाम नबी आझाद, शशी थरूर आदि नाराज गटाचे नेतेही उपस्थित होते पी चिदंबरम हेहीं यावेळी उपस्थित होते.

Leave a Comment