पोलिसांना गुंगारा देत सुशील कुमार 18 दिवसांत 7 राज्यांमधून भटकला; पण शेवटी जाळ्यात अडकलाच!

नवी दिल्ली – ख्यातनाम कुस्तीपटू सुशीलकुमार याला आज दिल्ली पोलिसांनी खुनाच्या आरोपाखाली अटक केली. गेले 20 दिवस तो अटक चुकवत फरारी होता, पण आज अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्‍या आवळल्या. आपल्याच एका सहकारी कुस्तीगिराची हत्या केल्याचा त्याच्यावर आरोप आहे. त्याला उत्तर पूर्व दिल्लीतील मुंडका भागातून अटक करण्यात आली. त्याच्यावर सागर राणा या 23 वर्षीय कुस्तीपटूची हत्या केल्याचा आरोप आहे.

दिल्लीच्या छत्रसाल स्टेडियमवरच हा हत्येचा प्रकार घडला आहे. सागर राणा आणि त्याच्या अन्य तीन साथीदारांवर सुशीलकुमार आणि त्याच्या सहकाऱ्याने हल्ला केला होता. त्यात जखमी झालेल्या अन्य तीन जणांवर अजूनही दिल्लीतील रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. हल्ल्याच्या प्रकारानंतर सुशीलकुमार व त्याचा साथीदार अजयकुमार हे फरारी झाले होते.

सागर राणाचा मृत्यू झाल्यानंतर सुशीलकुमार आधी उत्तराखंडमध्ये ऋषीकेशला गेला. तिथे तो एका साधूंच्या आश्रमात राहिला. तिथून दुसऱ्याच दिवशी तो दिल्लीला परतला. मीरत टोल प्लाझावर तो सीसीटीव्हीमध्ये कैद झाला. दिल्लीहून तो हरयाणामध्ये बहादूरगडला गेला. तिथून तो चंदीगडला गेला. चंदीगडहून सुशिलकुमार पंजाबमध्ये भटिंडाला गेला. भटिंडाहून तो माघारी गुरुग्रामला आला. पश्चिम दिल्लीमध्ये तो काही काळ राहिला. इथूनही त्याचा पुन्हा निसटण्याचा प्रयत्न होता. मात्र, बहादूरगडचा रहिवासी असलेल्या बबलूनं सुशिलकुमार कोणती कार वापरतोय, हे सांगितल्यामुळे पोलिसांचा त्याचा माग काढणं सोपं झालं. मात्र, आज त्याचा मित्र अजयसोबत एका बाईकवरून जाताना पोलिसांनी मुंडका परिसरातून त्याला अटक केली.

पोलिसांनी सुशीलकुमार याची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपये आणि अजयकुमार याची माहिती देणाऱ्याला 50 हजारांचे बक्षीस जाहीर केले होते. सुशीलकुमार हा लंडन आणि बिजिंग ऑलिम्पिक स्पर्धेतील पदकविजेता कुस्तीपटू आहे.