कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप?

बंगळूर – कर्नाटकच्या सत्तारूढ भाजपमधील धुसफूस वाढीस लागल्याचे चित्र आहे. त्या पक्षाचे वजनदार नेते आणि ज्येष्ठ आमदार बासनगौडा पाटील यत्नाल यांनी एक सनसनाटी दावा केला आहे. त्यातून त्यांनी बी.एस.येडियुरप्पा यांचे मुख्यमंत्रिपद धोक्‍यात असल्याचे संकेत दिले आहेत. तर, येडियुरप्पा समर्थकांनी यत्नाल यांच्याविरोधात दंड थोपटले आहेत. त्यातून भाजपमध्ये सर्व काही आलबेल नसल्याचे सूचित होत असल्याने कर्नाटकात लवकरच राजकीय भूकंप होण्याची शक्‍यता बळावली आहे.

कर्नाटकात नेतृत्वबदलाच्या चर्चा वारंवार पुढे येत आहेत. त्यासाठी प्रामुख्याने 77 वर्षीय येडियुरप्पा यांचे वाढते वय कारणीभूत ठरत आहे. त्याशिवाय, भाजपमध्ये उत्तर कर्नाटक विरूद्ध राज्याचा उर्वरित भाग अशी गटबाजी सुरू असल्याचेही सातत्याने दिसून येत आहे. अशातच यत्नाल यांनी येडियुरप्पा यांच्याविरोधात बंडाचे संकेत दिले आहेत. उत्तर कर्नाटकमधील जनतेच्या पाठिंब्यामुळे भाजपला मुख्यमंत्रिपद मिळाले. त्या विभागातून मोठ्या संख्येने भाजपचे आमदार निवडून आले.

त्याची जाणीव पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वालाही आहे. येडियुरप्पा यांचा वारसदार उत्तर कर्नाटकातील असावा, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याही मनात आहे. त्यामुळे येडियुरप्पा फार काळ मुख्यमंत्रिपदावर राहणार नाहीत, असे यत्नाल पत्रकारांशी बोलताना म्हणाले.

यत्नाल यांच्या दाव्यावर प्रदेश भाजपमधूनच तीव्र प्रतिक्रिया उमटली. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नलिनकुमार कटील यांनी यत्नाल यांचा दावा फेटाळून लावला. पुढील तीन वर्षे मुख्यमंत्रिपदावर येडियुरप्पाच राहतील, असे त्यांनी म्हटले. तर येडियुरप्पा यांच्या एका समर्थक आमदाराने यत्नाल स्वप्न पाहत असल्याची खिल्ली उडवली. त्यामुळे सत्तारूढ गोटातील तीव्र मतभेदही चव्हाट्यावर आले.

Leave a Comment