NIA Raid : उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र अन् दिल्लीसह डझनभर ठिकाणी NIA चे छापे

NIA Raid : पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या प्रतिबंधित संघटनेवर कारवाई करत राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) देशातील डझनभर ठिकाणी छापे टाकले आहेत. त्यात उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र आणि दिल्ली या राज्यांचाही समावेश आहे.

यापूर्वी एनआयएने रविवारी (08 ऑक्टोबर) तिरुवनंतपुरम विमानतळावरून पीएफआयच्या (PFI) संशयिताला ताब्यात घेतले होते. एजन्सीने या व्यक्तीला कुवेतला जाणार्‍या विमानात बसण्यापूर्वीच पकडले.

दरम्यान, दहशतवादविरोधी  कायद्यांतर्गत (UAPA) गेल्या वर्षी पीएफआयवर (PFI)  बंदी घालण्यात आली होती. पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI)  या प्रतिबंधित संघटनेच्या संदर्भात दिल्लीतील बल्लीमारन भागात NIA छापे टाकत आहेत.

एनआयएच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एजन्सीच्या प्रकरण क्रमांक 31/2022 मध्ये छापा टाकण्यात आला आहे, जो हिंसक आणि बेकायदेशीर  कारवायांमध्ये पीएफआय (PFI) आणि त्याचे नेते आणि कॅडर यांच्या सहभागाशी संबंधित आहे. हे सर्व आरोपी हिंसक आणि बेकायदेशीर कारवायांच्या उद्देशाने पाटण्यातील फुलवारीशरीफ भागात एकत्र आले होते.

मात्र, या सर्व प्रकरणार एनआयएच्या अधिकाऱ्यांनी अजूनपर्यंत मौन बाळगले असून अधिक काही बोलण्यास नकार दिला. सुरुवातीला 12 जुलै 2022 रोजी फुलवारीशरीफ पोलिस ठाण्यात एफआयआर म्हणून गुन्हा दाखल करण्यात आला होता. यानंतर एजन्सीने गेल्या वर्षी 22 जुलै रोजी पुन्हा गुन्हा दाखल केला.