nagar | नगरमधून नीलेश लंके तर शिर्डीतून भाऊसाहेब वाकचौरे विजयी

नगर, (प्रतिनिधी)- राज्यात जसे महायुतीचे पतन झाले, त्याच पद्धतीने नगर जिल्ह्यातही धक्कादायक निकाल लागला. अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे नीलेश लंके तर शिर्डी लोकसभा मतदारसंघातून आघाडीचेच भाऊसाहेब वाकचौरे हे विजय झाले आहेत. या दोघांनी विद्यमान खासदार डॉ.सुजय विखे व सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला.

लंके 29 हजार 314 मतांनी तर वाकचौरे 50 हजार 529 मतांनी विजयी झाले आहेत. अतिशय अटीतटीसह घासून झालेल्या या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत लंके व वाकचौरे यांनी बाजी मारली. या दोन्ही मतदारसंघाच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. त्यामुळे नगर लोकसभा मतदारसंघात ही निवडणूक चांगलीच प्रतिष्ठेची झाली होती.

मंगळवारी सकाळी आठ वाजता एमआयडीसीतील वखार महामंडळाच्या गोडावूनमध्ये मतमोजणीला प्रारंभ झाला. दोन्ही मतदारसंघाची मतमोजणी सुरू झाल्यावर शिर्डी मतदारसंघाची मतमोजणी वेगात सुरू होती. तर नगर दक्षिणची मतमोजणी संथगतीने सुरू होती. त्यामुळे निकालाची उत्सुकता वाढत होती.

नगर दक्षिणच्या मतमोजणीच्या पहिल्या सहा फेर्‍यांमध्ये महायुतीचे डॉ.सुजय विखे 9 हजार 629 मतांनी आघाडीवर होते. मात्र, सातव्या फेरीत लंके यांनी तब्बल 13 हजारांवर मतांची आघाडी घेत विखे यांची आघाडी मोडून काढून त्यांच्यावर 4 हजारांची आघाडी घेतली. त्यानंतरच्या सर्वच फेर्‍यांमध्ये लंके आघाडीवर राहिले.

त्यांनी शेवटच्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. अर्थात ही आघाडी फारशी नसली तरी ती विखेंना तोडता आली नाही. लंके यांना शेवगाव, श्रीगोंदा, पारनेर या तालुक्यातून मताधिक्क्य मिळाले. तर विखेेंना नगर शहर, राहुरी या दोन तालुक्यातून मताधिक्क्य मिळाले.

शिर्डी मतदारसंघामध्ये मतमोजणी सुरू झाल्यानंतर पहिल्या फेरीपासून महाविकास आघाडीचे भाऊसाहेब वाकचौरे यांनी महायुतीचे सदाशिव लोखंडे यांच्यावरील आघाडी कायम ठेवली. लोखंडे यांचा वाकचौरे यांनी 50 हजार 529 मतांनी पराभव केला. वाकचौरे यांना 4 लाख 76 हजार 900 तर लोखंडे यांना 4 लाख 26 हजार 371 मते मिळाली.

वंचित आघाडीच्या उत्कर्षा रुपवते यांना 90 हजार 929 मते मिळाली आहेत. वाकचौरे यांना अकोले विधानसभा मतदारसंघातून तब्बल 54 हजार 379 मतांची आघाडी मिळाली. त्या खालोखाल संगमनेरमधून 30 हजार 573 असे मताधिक्क्य मिळाले. या दोन तालुक्यातून मिळालेल्या मताधिक्क्यामुळे वाकचौरे यांचा विजय झाला.

या दोन्ही तालुक्यातील 84 हजार 952 मताधिक्क्य मिळाले. उर्वरित शिर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर व नेवासा या चारही विधानसभा मतदारसंघातून वाकचौरेंना एकाही मताची आघाडी नाही. या चारही मतदारसंघात लोखंडे यांना मताधिक्क्य मिळाले. मात्र, ते मताधिक्क्य या दोन तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे.