मुंबईतही निर्भया, शासकीय वसतिगृहातील विद्यार्थीनीवर अत्याचार करून हत्या

मुंबई :– चर्चगेट येथील सावित्रीबाई फुले वसतिगृहात एका 19 वर्षीय विद्यार्थीनीवर अत्याचार करुन तिची हत्या करण्यात आली. संबंधित मृत तरुणीचा विवस्त्र अवस्थेत मृतदेह आढळला होता. यानंतर वसतिगृहात कार्यरत असलेल्या संशयित सुरक्षा रक्षकाचा मृतदेह रात्री उशीरा चर्नीरोड- ग्रान्डरोड स्थानकांच्या दरम्यान आढळला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट उसळळी आहे.

या प्रकरणी आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. पोलिसांना माहिती मिळाली होती की सावित्रीबाई फुले हॉस्टेलमध्ये एक मुलगी मृतावस्थेत आढळली असून तिच्या खोलीचा दरवाजा बाहेरून लॉक आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मुलीवर अत्याचार करून तिची हत्या केल्याचे समोर आले आहे. वसतीगृहाच्या सुरक्षारक्षकाने हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे. संशयित सुरक्षारक्षक बेपत्ता झाला होता. या सुरक्षा रक्षकाने तरुणीच्या हत्येनंतर रेल्वे खाली उडी मारून आत्महत्या केली आहे.

दरम्यान, महिला वॉर्डनचा दावा आहे की, त्यांना योग्य सुरक्षा हवी होती. पण सरकारने दिली नाही. कोविडच्या काळात सरकारने पुरुष स्टाफची कपात केली होती. पीडित मुलीची रूममेट होती. पण तिने परीक्षा संपल्यानंतर वसतिगृहाची खोली सोडली. मुलींच्या वसतिगृहात महिला मदतनीस का नव्हत्या? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. मरीन लाइन वसतिगृहात वॉर्डन या प्राध्यापिका आहेत. धक्कादायक म्हणजे गेल्या 17 वर्षांपासून त्यांच्याकडे हा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे.

चौकशीसाठी समिती

या प्रकरणाची तातडीने दखल घेत सरकारने एक सदस्यीय समितीमार्फत चौकशी करण्याचे आदेश उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले आहेत. याप्रकरणी राज्याचे प्रकल्प संचालक डॉ. निपुण विनायक हे समितीचे अध्यक्ष असतील. राज्याचे उच्च शिक्षण संचालक आणि उच्च शिक्षण विभागाचे विभागीय सहसंचालक त्यांना मदत करतील. चौकशी अहवाल लवकरात लवकर दाखल करावा, असे सरकारी आदेशात म्हटले आहे.