नितीन गडकरींची मोठी घोषणा! सरकार पुढील वर्षभरात सर्व टोलनाके हटवणार

नवी दिल्ली : केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी गुरूवारी संसदेत मोठी घोषणा केली. पुढील वर्षभरात सरकार सर्व टोलनाके हटवणार असल्याचे म्हटले आहे. त्याच योजनेवर सध्या काम सुरु असल्याचे त्यांनी संसदेत सांगितले. येत्या काळात चालकांना तंत्रज्ञानाच्या मदतीने टोल तेवढाच द्यावा लागेल जेवढे त्यांचे वाहन रस्त्यांवर चालेल, असे त्यांनी स्पष्ट केले.

अमरोहा येथील बसपचे खासदार कुंवर दानिश अली यांनी गढ मुक्तेश्वर नजीक रस्त्यावर नगरपालिकेच्या सीमेत टोलनाके असल्याचा मुद्दा संसदेत उचलला होता. यावर उत्तर देताना गडकरी यांनी FASTag लागू झाल्यानंतर एका वर्षाच्या आत टोलनाके हटवण्याच्या योजनेवर काम सुरू असल्याचे त्यांनी म्हटले आहे. “यापूर्वीच्या सरकारमध्ये रस्ते योजनांच्या कंत्राटात थोडी आणखी मलाई घालण्यासाठी असे काही टोलनाके उभारण्यात आले जे नगरपालिकांच्या सीमेत आहेत. परंतु हे नक्कीच चुकीचे आणि अन्यायकारक आहे,” असे गडकरी म्हणाले.

“आता हे सर्व टोलनाके काढले गेले तर नक्कीच रस्ता तयार करणारी कंपनी याची भरपाई मागेल, परंतु सरकारने येत्या एका वर्षात देशातील सर्व टोलनाके हटवण्याची योजना तयार केली आहे,” असेही त्यांनी सांगितले. टोलनाके हटवण्याचा अर्थ हा टोल वसूली बंद करण्यावर नाही तर केवळ टोलनाके हटवणं असा आहे. सरकार सध्या अशा तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्याच्या माध्यमातून वाहन जेव्हा राष्ट्रीय महामार्गावर येईल तेव्हा जीपीएसच्या मदतीनं कॅमेरा तुमच्या वाहनाचा फोटो घेईल. तसेच जेव्हा तुम्ही राष्ट्रीय महामार्गावरून बाहेर पडाल तेव्हा तुमच्या वाहनाचा फोटो घेतला जाईल. यानुसार वाहन चालकांना तेवढ्याच अंतराचा टोल द्यावा लागणार असल्याचं गडकरींनी सांगितले.

टोल नाक्यांवर टोल वसूलीदरम्यान वाहनांच्या लागत असलेल्या रांगांमुळे होत असलेल्या त्रासाबद्दल अनेकदा आवाज उठवण्यात आला आहे. सध्या केंद्र सरकारने सर्व राष्ट्रीय महामार्गांवर FASTag ची सुविधा सुरू केली आहे. यामुळे लाईनमध्ये न लागताच ऑटोमॅटिक पद्धतीनं टोलनाक्यांवर टोल भरता येऊ शकतो.

Leave a Comment