बंगालमधील निवडणूक वेळापत्रक बदलण्यास नकार

नवी दिल्ली – पश्‍चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीच्या वेळापत्रकात कुठला बदल करण्यास निवडणूक आयोगाने नकार दर्शवला आहे. सहाव्या टप्प्यासाठी होणाऱ्या मतदानाच्या आदल्या दिवशी बुधवारी आयोगाने त्यासंदर्भात भूमिका स्पष्ट केली.

करोना संकटाची तीव्रता वाढल्याने निवडणूक वेळापत्रकात बदल करण्याची आग्रही मागणी तृणमूल कॉंग्रेस आणि कॉंग्रेस या पक्षांनी केली होती. तीन टप्प्यांचे मतदान एकाच वेळी घ्यावे, असे तृणमूलचे म्हणणे होते. तर, मतदान लांबणीवर टाकण्याची मागणी कॉंग्रेसकडून करण्यात आली होती. त्या पक्षांना निवडणूक आयोगाने उत्तर दिले. एकाच वेळी मतदान घेणे व्यवहार्य ठरणार नाही.

मतदारांच्या आरोग्याची काळजी म्हणून मतदानावेळी सर्व करोनाविषयक नियमांचे पालन केले जात आहे. बंगाल विधानसभेची मुदत 30 मे यादिवशी समाप्त होत आहे. त्याआधी नवी विधानसभा अस्तित्वात येणे गरजेचे आहे, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे.

बंगालमध्ये एकूण आठ टप्प्यांत मतदान होणार आहे. अखेरच्या टप्प्यासाठी 29 एप्रिलला मतदान होईल. त्यानंतर 2 मे यादिवशी निकाल जाहीर केला जाणार आहे.

Leave a Comment