“एकही आमदार अजित पवारांना सोडून जाणार नाही”

मुंबई – राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांचे वक्तव्य संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. एकही आमदार अजित पवार यांची साथ सोडणार नाही. पक्षाच्या बैठकीतही आम्ही ते बोलून दाखवले आहे. आम्ही आता जर त्यांना सोडून गेलो तर आमच्यासारखे करंटे आम्हीच असू असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे सिन्नर येथील आमदार माणिकराव कोकोटे यांनी म्हटले आहे.

एकही आमदार अजित पवार यांना सोडून जाणार नाही आणि असा नालायकपणाही कोणी करणार नाही. दादांची साथ सोडण्याचे एकही कारण नाही. सिन्नरच्या विकासासाठी जेवढे पैसे दादांनी दिले तेवढे पैसे आजपर्यंत कोणत्याही सरकारने दिले नाहीत. आमदार दादांची साथ सोडून जाणार अशा बातम्या पध्दतशीरपणे पसरवल्या जात आहेत. तो रोहित पवार यांचा डाव असू शकतो.

अजित पवार यांचे नेतृत्व सगळ्यांनी मान्य केले असून त्यांना सोडून जाण्याच्या संदर्भात एकाही आमदाराने अद्याप चर्चा केलेली नाही असे कोकाटे यांनी स्पष्ट केले. दरम्यान, लोकसभा निवडणुकीत महायुतीला जबर दणका बसल्यामुळे युतीतील अजित पवार गटाचे आमदार आणि शिवसेनेतील शिंदे गटाचे आमदार परतीच्या वाटेवर आहेत. अनेक जण आमच्या संपर्कात आहेत असा दावा शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून आणि उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून रोज केला जातो आहे.

विशेष म्हणजे केंद्रात पुन्हा एकदा नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे सरकार सत्तेवर येत असताना हे दावे केले जात आहेत. त्यातून महाराष्ट्रात पुन्हा उलथापालथ होणार का अशी शंका निर्माण होते आहे. शिंदे गटाने त्यांचे आमदार परत जाण्याचा प्रश्‍नच नसल्याचे म्हटले आहे तर आता अजित पवार गटाच्या कोकाटे यांनीही तशीच भूमिका मांडली आहे. त्यामुळे ही केवळ राजकीय पतंगबाजी सुरू असल्याचे मानले जाते आहे.