‘एफआयआर’मध्ये नाव नाही; खूनाचा प्रयत्न प्रकरणात 10 दिवसात जामीन

पुणे – कोयत्याने वार करून खूनाचा प्रयत्न केल्याप्रकरणात एकाला दहा दिवसात जामीन मंजुर झाला आहे. त्याचे नाव एफआयआरमधे नसून, केवळ मुख्य आरोपीने दिलेल्या जबाबावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्या विरोधात कोणताही ठोस पुरावा नसल्याने त्याला जामीन देण्याची मागणी बचाव पक्षातर्फे अॅड. अक्षय वैद्य यांनी केली. त्यानुसार सत्र न्यायाधीश ए.एन.मरे यांनी 15 हजार रुपयांच्या जातमुचलक्‍यावर त्याची सुटका केली.

ऋषिकेश शंकर केदारी (वय 20, रा. वारजे) असे जामीन झालेल्याचे नाव आहे. त्याने अॅड. अक्षय वैद्य यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला. मुख्य आरोपी विक्की ऊर्फ व्यंकटेश शिवशंकर अनापुर याच्यासह अन्य दोघांवर गुन्हा दाखल आहे.

सुनील शंकर कदम (वय 36, रा. केळेवाडी) याने याबाबत तक्रार दिली आहे. ही घटना वारजे येथील सहयोगनगर येथे घडली. भाडेकरूंना दारू पिऊन त्रास देऊ नका, म्हटल्याने फिर्यादींच्या डोक्‍यात कोयता मारून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणात मुख्य आरोपी विक्की याच्या जबाबावरून घटनास्थळी होता म्हणून केदारी याला अटक करण्यात आली होती.