“एकही बातमी विरोधात आली नाही पाहिजे, काही कलाकार पत्रकार…’; नेमकं चंद्रशेखर बावनकुळे काय म्हणाले, वाचा सविस्तर…

chandrashekhar bawankule – भाजपच्या (bjp) “घर चलो अभियान’साठी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (chandrashekhar bawankule) सध्या राज्यभर फिरत आहेत. मात्र कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना आपल्या विरोधात एकही बातमी छापून येऊ नये यासाठी पत्रकारांना चहाला घेऊन,

जा धाब्यावर घेऊन जा असा सल्ला त्यांनी दिला आहे. चंद्रशेखर बावनकुळेंनी (chandrashekhar bawankule) दिलेल्या या अजब सल्ल्याची ऑडिओ क्‍लिप सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय क्षेत्रात खळबळ उडाली असल्याचं दिसून येत आहे.

अहमदनगरच्या सावेडी येथे पदाधिकारी आणि बूथ कार्यकर्त्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. बावनकुळे यांनी पदाधिकाऱ्यांना आगामी निवडणुकीच्या मोर्चेबांधणीसंदर्भात मार्गदर्शन करताना हे विधान केले.

यावेळी चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, पत्रकारांनी 2024 पर्यंत आपल्याविरोधात (भाजप) बातम्या छापू नये, यासाठी त्यांना चहा प्यायला न्या. पत्रकारांना चहा प्यायला न्यायचे म्हणजे काय ते तुम्हाला समजलेच असेल.

तसेच पत्रकारांना ढाब्यावर जेवायला घेऊन जा. त्यात काही कमी-जास्त झाले तर सुजय विखे आहेतच. तुम्ही ज्या बूथवर काम करता. त्या बूथवर इलेक्‍ट्रॉनिक मीडियावाला कोण आहे? त्याची माहिती घ्या. आपण इतकं चांगले काम करतो, ते लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे.

आपल्या बूथवर जे चार-पाच कलाकार पत्रकार आहेत, त्यांची यादी बनवा. या पत्रकारांना महिन्यातून एकदा चहा प्यायला बोलवा. त्यांनी 2024पर्यंत आपल्याविरोधात लिहू नये यासाठी त्यांना चहा प्यायला बोलवा. त्यांना व्यवस्थित सांभाळून ठेवायचे. आपल्याविरोधात एकही बातमी आली नाही पाहिजे, असे बावनकुळे म्हणाले.

बावनकुळेंचे स्पष्टीकरण !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षात खूप चांगले काम केले आहे. तरीदेखील खूप निगेटिव्ह बातम्या येत असतात. पत्रकारांना चहा प्यायला बोलवा किंवा तुम्ही त्यांच्याकडे चहा प्यायला जा आणि त्यांना खरी वस्तुस्थिती सांगा.

कारण, शेवटी समाजात पत्रकारांना मोठे स्थान आहे. पत्रकार आपल्या न्यायवस्थेतील चौथा स्तंभ आहे. पत्रकारांना सन्मान देऊन त्यांच्यासोबत चांगलं वागा, या अर्थाने मी ते विधान केले आहे, असे स्पष्टीकरण बावनकुळे यांनी दिले.