अहमदनगर – नीलेश लंकेंच्या कामांची घेतली दखल..!

पारनेर  – मोटरसायकल रायडर्सचा भारतातील सर्वांत मोठा संच म्हणून ओळख असलेल्या पुण्याच्या रॅडऑन रायडर्सच्या सदस्यांना आ. नीलेश लंके यांच्या कामाची भुरळ पडली असून, या ग्रुपच्या 28 सदस्यांनी मोटरसायकल राईड करत पारनेर येथे येऊन आ. लंके यांची भेट घेतली.

या ग्रुपमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांचे नियोजन करण्यासाठी 33 जणांची कमिटी असून, ग्रुपच्या कॅप्टन महिला आहेत. ग्रुपमध्ये पुरुषांबरोबरच महिलांचाही समावेश आहे. या ग्रुपला ट्रेडमार्क आणि आयएसओ मानांकनही मिळाले असून, दर रविवारी वेगवेगळ्या ठिकाणांना हा ग्रुप भेटी देऊन सामाजिक उपक्रम राबवितो. आश्रमशाळा, तसेच महिला व इतर गरजूंना मदत करण्यास प्राधान्य दिले जाते. या ग्रुपच्या प्रमुख संस्थापकांमध्ये डॉ. किशोर शिंदे, ऍड. नरेश शेळके, कॅप्टन स्मिता म्हस्करेन्स, अफझल हयात असून, अक्षय विसपुते, भाग्येश क्षीरसागर, बापू गायकवाड, जेरी डिक्रुझ, सचिन तलवार, जयेश जगताप हे सदस्य आहेत.

आ. लंके गेल्या अनेक वर्षांपासून विविध सामाजिक उपक्रम राबवून गरजूंना मदतीचा हात देत असून, त्यांच्या या सेवाभावी स्वभावामुळे एक वेगळी प्रतिमा तयार झाली आहे. करोना काळात शरदचंद्र आरोग्य मंदिराच्या माध्यमातून आ. लंके यांनी हजारो रुग्णांना जीवदान दिले. स्वतः करोना रुग्णांमध्ये राहून त्यांनी त्यांचा आत्मविश्‍वास वाढविला.

 

आ. लंके यांची राइड
या तरुणांनी आणलेल्या महागड्या दुचाकीवरून राइड मारण्याचा मोह आ. लंके यांनाही आवरला नाही. सुमारे 20 लाखांच्या दुचाकीवरून आ. लंके यांनी राइड मारत या तरुणांना प्रोत्साहन दिले. सुरक्षिततेची कशी काळजी घेता, तसेच राईडबाबतची इतर माहिती घेऊन आ. लंके यांनी आस्थेने विचारपूस केली.