nagar | आता फक्त देश विकायचा बाकी आहे

शेवगाव (प्रतिनिधी) – भाजप सरकार शेतकरी, गरिबांच्या विरोधी आहे. शेतीसाठी लागणारी खते, बी-बियाणे, औषधांवर अठरा टक्के जीएसटी असून, हिऱ्यावर मात्र चार टक्के जीएसटी आकारली जाते. शेतकऱ्यांकडून १८ टक्के जीएसटी वसूल करून त्यातील ६ हजार रुपये शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली भूलभूलैया केला जातो.

या सरकारने महत्वाचे सर्व सार्वजनिक उद्योग व्यवसाय विकले असून आता फक्त देश विकायचा बाकी आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार पक्षाचे राज्य सरचिटणीस ॲड. प्रताप ढाकणे यांनी केली.

महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे उमेदवार नीलेश लंके यांच्या प्रचारार्थ येथील महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तालुक्यातील दहिफळ, गोळेगाव, चापडगाव, भातकुडगाव, ढोरजळगाव, शेवगाव आदी गावोगावी वाड्या-वस्त्यांवर प्रचार फेऱ्या काढून कोपरा बैठका घेत मतदारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते .

ढाकणे म्हणाले, भाजपाचे खरे स्वरूप सर्वसामान्यांना पटले आहे. तालुक्यातील खरडगाव, मंगरूळ बु , राणेगाव, शिंगोरी या गावांनी मागील निवडणुकीत भाजपला भरभरून मते दिली होती. मात्र, गेल्या पाच वर्षात भ्रमनिरास झालेली ही गावे बदल्यासाठी आता पेटली आहेत. येथील ग्रामस्थांनी मते तर देऊच पण वर्गणी गोळा करून आर्थिक मदतीसाठी देखील सरसावण्याची भूमिका आज घेतली आहे.

राष्ट्रवादी शरदश्चंद्र पवार गटाचे तालुकाध्यक्ष हरिष भारदे म्हणाले, भाजपने मागील दोन्ही निवडणुकीत दिलेल्या एकाही आश्वासनाची पूर्तता अद्याप केलेली नाही. देशात प्रचंड महागाई व बेरोजगारी वाढली आहे.

ठिकठिकाणच्या या प्रचार फेऱ्यांमध्ये केदारेश्वरचे उपाध्यक्ष प्रा.माधव काटे, सुनिल रासने, माजी सरपंच राहुल मगरे, वजीर पठाण, एजाज काझी, बाळासाहेब डाके, राहुल वरे यांचेसह कम्युनिस्ट पक्षाचे राज्यसचिव कॉ.ॲड सुभाष पाटील लांडे, कॉ. संजय नांगरे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता फुंदे आदी अनेक कार्यकर्ते होते.