‘आता राजकारणात आयपीएलसारख्या बोल्या’; उद्धव ठाकरेंची मोदींवर घणाघाती टीका

रायगड  – आता राजकारणतही आयपीएलसारख्या बोल्या लागत आहे. जो येथे होता तो दुसऱ्या टीममध्ये जातो, तसेच सध्या राजकारणात झाले आहे. तसेच आता माझ्याबद्दल त्यांचे प्रेम जागृत झाले.

मला तुमच्या सुरक्षेची, चौकशीची गरज नाही, मला हे जनतेचे सुरक्षा कवच आहे, अशा शब्‍दांत उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर तोफ डागली आहे.

रायगड मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार अनंत गीते यांच्या प्रचारसभेत उद्धव ठाकरे यांनी रविवारी भाजप सरकार आणि नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला.

उद्धव ठाकरे म्‍हणाले, मी जेव्हा रुग्णालयात होतो, तेव्हा आमच्या गद्दारांसोबत कोण बोलीचाली करत होते. बाळासाहेब ठाकरे याचे माझ्यावर कर्ज आहे म्हणतात, आता महाराष्ट्राची जनता व्याजासकट कर्ज परत करणार आहे.

हिंदुत्वाच्या नावाखाली तुम्ही नंगा नाच करत आहात. मोदींवर आम्ही खूश आहोत, हे जनतेने सांगावं, मी त्यांचा प्रचार करेल. शहा म्हणतात, मला आव्हान देताय.

मला प्रश्न विचारतायत. तुम्ही महागाईवर बोला, जनतेच्या प्रश्नावर बोला. कोण किती खोटं बोलताय, हे कळेल, असं म्हणत त्‍यांनी अमित शहांवरही निशाणा साधला.

महाराष्ट्राला डाग लावणाऱ्यांसोबत पुन्हा जाणार नाही
कितीही दरवाजे आता उघडा मी आता कधीही सोबत येणार नाही. दरवाजे उघडले तरी तुम्ही आता तिथे असणार का? ज्या महाराष्ट्राला तुम्ही डाग लावला. त्या डाग लावणाऱ्यांसोबत कधीही बाळासाहेब ठाकरे यांचा पुत्र जाणार नाही.

2014 साली मला राजनाथ सिंह यांचा फोन आला होता, पार्लिमेंटरी बोर्डची बैठक आहे, मोदी यांचे नाव आम्ही पंतप्रधान पदासाठी समोर करत आहे. मी तेव्हा अडून राहिलो असतो, पण मी तसं केलं नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले.