आता सुप्रीम कोर्टाचीही व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा; केसेस, प्रकरणांची यादी, आदेश आणि निकालाची मिळणार माहिती

नवी दिल्ली- सर्वोच्‍च न्‍यायालयाने डिजिटायझेशनच्‍या दिशेने आणखी एक महत्त्वपूर्ण पाऊल टाकत व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे. या माध्‍यमातून खटला दाखल करण्यापासूनची इतर सर्व माहिती प्रकरणाची तारीख वकिलांना त्यांच्या व्हाट्सॲपवर मिळणार आहे.

सर्वोच्‍च न्‍यायालयाच्‍या स्‍थापनेला ७५ वर्षे पूर्ण होत असून सरन्‍यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी गुरुवारी या सेवेची घोषणा केली. त्यानिमित्त वकिलांना एक खास गिफ्ट मिळाले आहे. चंद्रचूड म्‍हणाले, सर्वोच्च न्यायालयाने एक छोटासा उपक्रम सुरू केला आहे. त्याचा मोठा प्रभाव पडण्याची क्षमता आहे.

व्हॉट्सॲप मेसेंजर ही आपल्या दैनंदिन जीवनात सर्वव्यापी सेवा आहे आणि एक शक्तिशाली संप्रेषण साधनाची भूमिका घेतली आहे. न्याय मिळवण्याचा अधिकार बळकट करण्यासाठी आणि न्यायिक व्यवस्थेत पारदर्शकता वाढवण्यासाठी व्हॉट्सॲप मेसेजिंग सेवा सुरू करण्‍याचा निर्णय घेतला आहे.

या उपक्रमांतर्गत वकीलांना सर्वोच्च न्यायालयासमोर वैयक्तिकरित्या हजर राहणे, केसेस, प्रकरणांची यादी, आदेश आणि निकाल यांच्या इलेक्ट्रॉनिक फाइलिंगबद्दल स्वयंचलित संदेश मिळतील.

तसेच पुर्वीप्रमाणे बारच्या सर्व सदस्यांना रजिस्ट्रीद्वारे याद्याही पाठवल्या जातील. वेबसाइटवर उपलब्ध असलेले आदेश आणि निर्णय व्हॉट्सॲपद्वारे देखील पाठवले जातील, अशी माहिती त्‍यांनी दिली.

यावेळी त्‍यांनी सर्वोच्च न्यायालयाचा अधिकृत व्हॉट्सॲप नंबर 8767687676 हा देखील शेअर केला. यामुळे न्‍यायालयीन कामांमध्ये लक्षणीय बदल होईल. तसेच कागद आणि वेळेचीही बचत करण्यात खूप मदत होईल.

केंद्र सरकार न्यायपालिकेच्या कामकाजाचे डिजिटलायझेशन करण्यासाठी पावले उचलत असून ई-कोर्ट प्रकल्पासाठी 7,000 कोटी रुपये मंजूर केले आहेत, अशी माहिती त्‍यांनी दिली.