अनिवासी भारतीय लोकसभेच्या निवडणुकीत मतदान करू शकतात का? ; समजून घ्या सोप्या भाषेत मतदानाचे नियम

NRI Voters of India । देश येत्या १९ एप्रिलपासून लोकसभा निवडणूक लागल्या आहेत. त्यातच भारतात १८ वर्षांवरील प्रत्येक व्यक्तीला मतदानाचा अधिकार आहे. अट एवढीच आहे की नागरिकाने आपले भारतीय नागरिकत्व सोडले नसावे. मतदानासंबंधी देशातील नियम आणि कायदे काय सांगतात ते जाणून घेऊया?

भारतातील 18व्या लोकसभा निवडणुकीच्या तारखा नुकत्याच जाहीर झाल्या. याअंतर्गत देशभरात 7 टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पहिला टप्पा 19 एप्रिल 2024 रोजी सुरू होईल आणि मतदानाचा शेवटचा टप्पा 1 जून रोजी संपेल. त्यानंतर ४ जून रोजी सर्व ठिकाणचे निकाल एकाच वेळी जाहीर होतील.

अशा परिस्थितीत परदेशात राहणाऱ्या भारतीयांनाही या लोकसभा निवडणुकीत मतदान करता येईल की नाही, हा एक अतिशय रंजक प्रश्न उपस्थित होतोय. परदेशात राहणाऱ्या भारतीय नागरिकांना 2010 पर्यंत मतदानाचा अधिकार नव्हता. सध्या त्यांना हा अधिकार मिळाला आहे, मात्र अनिवासी भारतीयांना मतदान केंद्रावरच हजर राहावे लागेल, असा नियम जोडण्यात आलाय.

दरम्यान,दीर्घकाळापासून अनिवासी भारतीय रिमोट व्होटिंगची मागणी करत आहेत, जेणेकरून ते ज्या देशात असतील त्याठिकाणाहून  भारतात होणाऱ्या निवडणुकीत मतदान करू शकतील. या विषयावर भारताच्या सर्वोच्च न्यायालयात अनेक याचिकाही दाखल झाल्या होत्या. त्याबाबत निवडणूक आयोगाचे म्हणणे आहे की, रिमोट व्होटिंगची प्रणालीही लवकरच कार्यान्वित केली जाईल.

भारतीय कायदा काय म्हणतो? NRI Voters of India ।

भारतीय नियमांनुसार, भारताबाहेर राहणाऱ्या कोणत्याही नागरिकाला निवडणुकीत मतदान करण्याची संधी तेव्हाच मिळते जेव्हा त्याने देशाचे नागरिकत्व सोडले नसेल. म्हणजेच त्याच्याकडे देशाचा पासपोर्ट असावा.

दशकापूर्वी अनिवासी भारतीयांना अधिकार नव्हते

भारतात, सुमारे एक दशकापूर्वी, म्हणजे 2010 पूर्वी, परदेशात राहणाऱ्या भारतीयांना मतदानाचा अधिकार नव्हता. भारतीय नागरिक सहा महिन्यांहून अधिक काळ परदेशात राहिल्यास त्याचे नाव मतदार यादीतून काढून टाकले जाईल, असा त्यावेळचा कायदा होता. त्यानंतर 2010 साली लोकप्रतिनिधी कायद्यात बदल करण्यात आले. त्यानंतर अनिवासी भारतीयांना मतदानाचा अधिकार मिळाला पण त्यातही एक समस्या निर्माण झाली. अडचण अशी आहे की RP कायद्याच्या कलम 20A नुसार, कोणत्याही व्यक्तीला मतदान करण्यासाठी बूथवर येणे अनिवार्य आहे, म्हणजे NRI मतदान करू शकतात परंतु त्यांना मतदान करण्यासाठी फक्त बूथवर जावे लागेल. या कारणास्तव, बहुतेक अनिवासी भारतीय प्रत्येक निवडणुकीत त्यांचे मत देण्यापासून वंचित राहतात.

अनिवासी भारतीय त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करू शकतात NRI Voters of India ।

देशातील कोणताही नागरिक शिक्षण, नोकरी किंवा इतर कोणत्याही कारणास्तव परदेशात राहत असेल, तर त्याला मतदार यादीत नाव समाविष्ट करता येईल. यासाठी १८ वर्षांवरील कोणताही अनिवासी भारतीय निवडणूक आयोगाच्या https://voters.eci.gov.in/ वेबसाइटला भेट देऊ शकतो. परदेशी मतदारांसाठी नवीन नोंदणीचा ​​फॉर्म 6A भरू शकतो, त्यानंतर काही दिवसांत नाव जोडले जाईल. . परदेशातील लोक भारतीय दूतावासाकडून फॉर्म 6A मोफत घेऊ शकतात. मतदार यादीत नाव समाविष्ट झाल्यानंतर, कोणताही अनिवासी भारतीय मतदान करू शकतो, त्याला फक्त त्याच्या पासपोर्टसह बूथवर उपस्थित राहावे लागेल.

अद्याप ऑनलाइन मतदानाची सुविधा नाही

सध्या कोणत्याही अनिवासी भारतीयांना ऑनलाइन मतदान करण्याची सुविधा नाही. सध्या केवळ निवडणूक कर्तव्यात गुंतलेले सरकारी कर्मचारी, लष्करातील कर्मचारी किंवा परदेशात काम करणारे अधिकारी यांना इलेक्ट्रॉनिक किंवा पोस्टाद्वारे मतदान करण्याची सुविधा आहे. अशा मतदारांना सेवा मतदार असेही म्हणतात.

हे सेवा मतदार इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम (ETPBS) द्वारे मतदान करतात. ETPBS वापरून, पोस्टल मतपत्रिका प्रथम सेवा मतदारांना पाठवल्या जातात. यानंतर, सेवा मतदार ते डाउनलोड करून त्यांचे मत देतात आणि नंतर ते ईमेल किंवा पोस्टद्वारे रिटर्निंग ऑफिसरला पाठवतात.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत 18 लाखांहून अधिक पोस्टल मतपत्रिका पाठवण्यात आल्या होत्या, त्यापैकी 10.84 लाख सेवा मतदारांनी त्या भरल्या आणि पाठवल्या. म्हणजेच ETBPS च्या माध्यमातून 60 टक्क्यांहून अधिक मतदान झाले. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, ते अनिवासी भारतीयांसाठी अशीच सुविधा तयार करत आहेत पण ती अद्याप तयार झालेली नाही.

तीन वर्षांपूर्वी निवडणूक आयोगानेही याबाबत केंद्र सरकारकडे प्रस्ताव मांडला होता. अनिवासी भारतीयांसाठी रिमोट मतदानाची सुविधा सुरू करण्याचा विचार करत असून लवकरच ती सुरू करणार असल्याचेही केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात सांगितले होते.

अनिवासी भारतीयांची संख्या कोटींच्या घरात  

भारतीय परराष्ट्र मंत्रालयाच्या मते, जगाच्या कानाकोपऱ्यात सध्याच्या प्रवासी भारतीयांची संख्या सुमारे 1 कोटी 36 लाख आहे. त्यापैकी सर्वाधिक 34.19 लाख लोक यूएईमध्ये राहतात. अमेरिकेत 12.80 लाख भारतीय आहेत. यापैकी, निवडणूक आयोगानुसार, 1.25 लाख भारतीय नोंदणीकृत आहेत.