सोशल मीडियावर महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; साताऱ्यात तणाव, खबरदारी म्हणून इंटरनेट सेवा बंद

सातारा : सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी गावात एका व्यक्तीने महापुरुषांविषयी आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने दोन गटात तणाव निर्माण झाला. त्यानंतर या घटनेचे तीव्र पडसाद उमटले.  यानंतर एका गटाने विशिष्ठ समुदायास लक्ष्य करत जाळपोळ, दगडफेक करत प्रार्थना स्थळावर हल्ला केला. यात एक युवक गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात तणाव असून मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. पोलिसांनी सर्वांना शांततेचे आवाहन केले असून खबरदारी म्हणून सर्व इंटरनेट सेवा बंद ठेवण्यात आल्या आहेत

या घटनेनंतर साताऱ्यात इंटरनेट सेवा खंडीत करण्यात आली आहे. याबाबत अफवा पसरत असल्याने सातारा पोलीस अधीक्षकांनी आज  निवेदन जारी करत याबाबत माहिती दिली आहे. सातारा पोलीस अधीक्षकांनी शांततेचे आवाहन करत, “१० सप्टेंबर २०२३ रोजी पुसेसावळी येथे एका व्यक्तीने सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकली होती. या पोस्टवरुन लोकांचा गैरसमज होऊन कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण झाला होता. या ठिकाणी तात्काळ सातारा पोलीसांनी प्रतिसाद देऊन या ठिकाणची परिस्थिती आटोक्यात आणली. सध्या पुसेसावळी व परिसरात कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ दिलेला नाही. या ठिकाणी शांतता आहे. तसेच आवश्यक त्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त नेमण्यात आला आहे.” असे म्हटले आहे.

त्यासोबतच “या घटनेच्या अनुषंगाने जिल्ह्यातील नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. तसेच सोशल मीडियाद्वारे समाजात तेढ निर्माण होणारे संदेश प्रसारीत करु नयेत. जेणेकरुन कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सतर्क व दक्ष राहून काही अनुचित प्रकार आढळून आल्यास तात्काळ प्रशासनाशी संपर्क साधावा,” असे आवाहन सातारा पोलिसांनी केले आहे.

या घटनेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनीही प्रतिक्रिया दिली. त्या म्हणाल्या, “सातारा जिल्ह्यातील पुसेसावळी (तालुका – खटाव) येथील घटना दुःखद आहे. माझे जनतेला आवाहन आहे की, कृपया कोणत्याही अफवेला बळी पडू नका. समाजात सौहार्द आणि शांतता राखण्यासाठी आपण शासन-प्रशासन तसेच पोलीस खात्याला सहकार्य करावे.” असे आवाहनदेखील त्यांनी केले.


तर दुसरीकडे राष्ट्रवादीचे खासदार श्रीनिवास पाटील यांनी,“खटाव तालुक्यातील पुसेसावळी येथील घटना अतिशय दुःखद आणि दुर्दैवी आहे. माझे नागरिकांना जाहीर आवाहन आहे की, कृपया कोणत्याही अफवेला बळी न पडता शांतता आणि संयम राखण्यासाठी शासन व प्रशासनाला सहकार्य करावे. माझे परिस्थितीवर लक्ष असून मी प्रशासनाच्या संपर्कात आहे.” असे म्हटले आहे.