नागपूर: शासकीय रुग्णालयातील रुग्णांच्या मृत्यूची अधिकाऱ्यांनी सांगितली खरी संख्या

नागपूर – नांदेडच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात 24 तासांत 24 रुग्णांचा मृत्यू झाल्यामुळे राज्यभरात संताप व्यक्त होत असतानाच आता नागपुरातील मेडिकल-मेयो या दोन्ही शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांतही 24 तासांत 25 मृत्यू झाल्याच्या बातम्या सोशल मीडियावर आल्याने खळबळ माजली होती.

मात्र वस्तुस्थिती अशी नसून मेयो आणि मेडिकलमध्ये अत्यवस्थ आणि व्हेंटीलिटरवरील रूग्णांचे दिवसाला पाच ते सहा मृत्यू होत असल्याची माहिती वैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे आणि मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली आहे.

मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांवर विदर्भासह मध्यप्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा या राज्यातीलही अत्यवस्थ रुग्णांचा भार आहे. या रुग्णांसाठी मेडिकलला 1 हजार 401 अधिकृत तर ट्रामा व अतिरिक्त मिळून एकूण सुमारे 1,800 खाटा आहेत. मेयो रुग्णालयात 822 खाटा आहेत. दोन्ही रुग्णालयांत रोज सुमारे दीड हजार रुग्ण दाखल होऊन उपचार घेतात.

खासगी रुग्णालये त्यांच्याकडील रूग्णांना शेवटच्या क्षणी त्यांना मेडिकल-मेयोत हलवतात. विष प्राशन, हृदयविकार, आत्महत्येचा प्रयत्न, खूनाचा प्रयत्न असे रूग्ण शेवटच्या क्षणी मेयो आणि मेडिकलला येतात. त्यांच्या जगण्याची शक्‍यताही तशीही कमी असते. पण, शर्थीच्या प्रयत्नानंतरही हे रूग्ण दगावतात. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनच्या निरीक्षणा नुसार 1 हजार खाटांमध्ये 6 ते 8 मृत्यू होणे कॉमन आहे असे डॉ. पांडे यांनी सांगितले.

हाफकिनकडून खरेदीच नाही
मेडिकल आणि मेयो या दोन्ही रुग्णालयांमध्ये काही औषधे रुग्णांना बाहेरून आणायला लावल्या जात असल्या तरी राज्यातील इतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयांच्या तुलनेत येथे औषधांचा तीन महिने पुरेल एवढा साठा आहे.

सर्पदंशासाठी आवश्‍यक इंजेक्‍शनसह इतर काही औषधांचाही वर्षभर पुरेल एवढा साठा असल्याचीही माहिती प्रशासनाने दिली. संपूर्ण विदर्भातील मेडिकल कॉलेजेस आणि सरकारी दवाखान्यातून येथे अगदी मृत्यूच्या जवळ पोहोचलेले रूग्ण रेफर केले जातात. बहुतांश मृत्यू अशा रेफर केलेल्या रूग्णांचे असतात, अशी माहिती मेडिकलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शरद कुचेवार यांनी दिली आहे.