सासू-सासऱ्याच्या स्मरणार्थ सुनेने उभारले वृद्धाश्रम

मेढा – समाजातील सध्याच्या परिस्थिती पाहिली तर वृद्धापकाळात आई-वडिलांचा सांभाळ करण्याऐवजी मुलांकडून त्यांची हेटाळणीच होत असल्याचे पहावयास मिळते. समाजातील ही परिस्थिती कमी होण्याऐवजी दिवसेंदिवस वाढतच आहे. विशेष म्हणजे पोटची मुलेच आई वडिलांकडे पाठ फिरवत असल्याने सुनांकडून काय अपेक्षा करणार? असा प्रश्‍न निर्माण होत असतानाच जावली तालुक्‍यातील बिभवी येथे एका सुनेने आपल्या सासू सासऱ्यांच्या आठवणीत वृद्धाश्रमाची उभारणी करुन समाजात एक आदर्श निर्माण करत अनोखा संदेश दिला आहे.

संगीता संजय परिहार असे या सुनेचे नाव आहे. अगदी जन्मापासून ते लग्न होईपर्यंत प्रत्येक आई वडिल आपल्या मुलांसाठी काबाडकष्ट करुन त्यांची हौस पुरवत असतात. ऊन, वारा, पाऊस अगदी कशाचीही तमा न बाळगता झिजत असता. हे सारं काही सुरु असतं ते फक्त आपल्या मुलांसाठी. लग्न होईपर्यंत मुलांसाठीही आपले आई-वडिल अगदी दैवतच असतात. मात्र लग्नानंतर मुलांमध्ये असे काही बदल घडतात की मुलांना आपली बायको हेच आपले सर्वस्व असे वाटू लागते.

ज्यांनी आपल्यासाठी संपूर्ण आयुष्य झिजवलं, कधीही स्वत:च्या सुखांचा विचार केला नाही, असे आई वडिल मुलांना वृद्धापकाळात नकोसे वाटू लागतात. अगदी काही अपवाद वगळता समाजातील ही परिस्थिती वाढत आहे. मुलांकडूनच आईवडिलांकडे दुर्लक्ष केले जात असल्याने सुनांकडून तरी काय अपेक्षा करणार? असा प्रश्‍न वृद्ध माता-पित्यांपुढे उभा असतो. मात्र या प्रकारला छेद देणारी घटना जावळी तालुक्‍यात घडली.

सासू-सासऱ्यांना मातापित्यासमान माणणाऱ्या बिभवी येथील एका सुनेने सासू सासऱ्यांच्या आठवणीत चक्क वृद्धाश्रमाची उभारणी केली आहे. संगीता संजय परिहार असे या सुनेचे नाव असून तालुकाच नव्हे तर जिल्हाभर त्यांचे कौतुक होत आहे.

बिभवी येथील संगीता परिहार यांनी आपल्या सासू सासऱ्यांच्या आठवणी कायम स्मरणात रहाव्यात यासाठी आई-आप्पा या नावाने वृद्धाश्रम बांधले आहे. मेढा पंचायत समितीच्या सहाय्यक गटविकास अधिकारी सोनवणे, मेढा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक राठोड यांच्या हस्ते नुकतेच या वृद्धाश्रमाचे उद्‌घाटन करण्यात आले. यावेळी आरपीआयचे जावली तालुका अध्यक्ष रोकडे, बिभवी गावच्या सरपंच सौ. जयश्री जाधव, प्रवीण देशमुख, दुदळे सर, मंगल देशमुख, राजेंद्र जाधव, ग्रामसेवक सुरवसे, सिद्धार्थ परिहार, रजंना परिहार, शिवाजी जाधव, सुनिल शिंदे, शंकर परिहार, बापु परिहार, धोंडिबा कांबळे, सुहास परिहार, अमित परिहार आणि ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Comment