ब्रेक डान्सचा ऑलिम्पिक प्रवेश


बी-बॉइंग किंवा हिपहॉप नावाने ओळखला जाणारा ब्रेक डान्स हा खरेतर नृत्याचाच प्रकार इतपतच आपल्याला माहिती. मात्र, 2024 साली पॅरिसमध्ये होत असलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत त्याचा क्रीडा प्रकारात समावेश झाला आणि तमाम नृत्यप्रेमींना आश्चर्याचा धक्का बसला.

या खेळाचा म्हणा किंवा नृत्याचा जन्मदाता असलेला मायकल जॅक्सन यानेच अनेक वर्षांपूर्वी हा खेळ म्हणूनही नावारुपाला येऊ शकतो असे विधान केले होते. त्यावेळी त्याला सो-कॉल्ड क्रीडा समीक्षकांनी वेडे ठरवले होते. पण त्याची दूरदृष्टी किती मोठी होती हे आता पटू लागले आहे.

ब्रेक डान्सचा आता अधिकृतपणे ऑलिम्पिकमध्ये समावेश झाला असून त्याला आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीने (आयओसी) मान्यताही दिली. युवकांना या स्पर्धेकडे खेचण्यासाठीच समितीने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. केवळ ब्रेक डान्सच नव्हे तर स्केटबोर्डिंग, स्पोर्ट क्लायंबिंग तसेच सर्फिंग या अन्य तीन खेळांचाही या स्पर्धेत समावेश करण्यात आला आहे. करोनामुळे एक वर्षासाठी लांबणीवर टाकल्या गेलेल्या टोकियो ऑलिम्पिकमध्ये प्रदर्शनिय स्तरावर समावेश करण्यात येणार होता. मात्र, त्याबाबत अद्याप काहीही स्पष्ट करण्यात आले नसले तरीही उगवत्या सूर्याच्या साक्षीने त्याचे प्रात्यक्षिक निश्चितच होईल असा विश्वास वाटतो.

ऑलिम्पिक स्पर्धेत या ब्रेक डान्सला ब्रेकिंग असे संबोधण्यात येणार आहे. याची खरी ओळख बी-बॉइंग असीच केली जात होती. मायकल जॅक्सनने जेव्हा आपला पहिला जाहीर कार्यक्रम केला तेव्हा हा एक नृत्यप्रकार म्हणून पाहिला गेला. याचा जन्म मायकल जॅक्सकडून झाला असे सांगितले जात असले तरीही त्याचा उगम आफ्रिकी-अमेरिकी लोकांमध्ये हिपहॉप संस्कृतीच्या रूपाने विकसित होऊन नंतर न्यूयॉर्क शहरातील लॅटिन तरुणांमध्ये चांगलाच लोकप्रिय झाला. 70 च्या दशकात अमेरिकेत हिपहॉपचे बारसे ब्रेक डान्स असे झाले. दोन वर्षांपूर्वी ब्यूनोस आयर्स यूथ ऑलिम्पिकमध्ये त्याचा प्रायोगिक तत्त्वावर समावेश करण्यात आला होता.

या नृत्य किंवा क्रीडा प्रकारात मुख्यत्वे चार प्रकार असतात. टॉपरॉक, डाऊनरॉक, पॉवर मुव्हज आणि फ्रीझ अशा चार प्रकारात हा ब्रेक डान्स प्रसिद्ध आहे. पहिल्या प्रकारात उभे राहूनच पायताल केले जाते. त्यात संताप, शांतता तसेच उत्तेजना असे भाव सादर केले जातात. पॉपिंग व लॉकिंगचाही यात समावेश असतो. डाऊनरॉकमध्ये पायांच्या हालचालींवर संतुलन करताना लय सांभाळली जाते. यात हात व पाय या दोन्हीचाही वापर केला जातो. यालाच फुटवर्क किंवा फ्लोअरवर्क म्हणतात. पॉवर मूव्हज हा प्रकार काहीसा कसरतीचा आहे. त्यात चालण्याचा वेग वाढवला जातो तर काही वेळा संथही केला जातो. मूनवॉक आपण सर्वांनीच पाहिले आहे. फ्रीझ या प्रकारात आपल्या शारीरिक व मानसिक शक्तीचे सादरीकरण केले जाते. याला कलात्मक स्थितीही मानले जाते. या प्रकारात कलाकाराला किंवा खेळाडूला (ब्रेकर) जमिनीपासून वर आपला तोल सांभाळावा लागतो. तसेच संगीताची लयही पकडावी लागते. हा प्रकार जेव्हा सुरू होतो तो क्षण या नृत्याचा अखेरचा ताल समजला जातो. भारतातही हा ब्रेक डान्स 1980 च्या दशकापासून प्रचंड लोकप्रिय झाला. मायकल जॅक्सनचा आदर्श घेत प्रभुदेवाने त्यात आपली चमक सिद्ध केली. हा नृत्य प्रकार असला तरीही त्याला खेळ समजले जाऊ लागल्याने येत्या काळात भारतातही या क्षेत्रात नवनवे खेळाडू तयार होतील, अशी शक्यता नाकारता येत नाही. असो, हा खेळ की नृत्य प्रकार या वादात न पडता त्याच्या ऑलिम्पिक प्रवेशाचे स्वागत करू आणि येत्या काळात भारतातही या खेळात आपले वर्चस्व सिद्ध करणारे खेळाडू तयार होतील असा विश्वास बाळगू.

Leave a Comment