दसऱ्याच्या पूर्वसंध्येला पुणे मार्केट यार्डात 21 टन फुलांची आवक

पुणे- दसऱ्याच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. 4) मार्केट यार्डात 690 वाहनांमधून तब्बल 21 टन फुलांची आवक झाल्याची माहिती बाजार समितीचे प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. फुल महोत्सव सुरू असल्याने खरेदीदारांसह घरगुती ग्राहक मोठ्या संख्येने मार्केट यार्डात येत होते. आवक इतकी मोठी असल्याने शिवनेरी रस्त्यावर गाड्या लावून काही प्रमाणात विक्री करण्यात आली. सर्वाधिक मागणी झेंडूला आहे. सकाळी ग्राहकांनी गर्दी केली होती.

भाव मिळत असल्याने शेतकरी दसऱ्यासाठी माल राखीव ठेवत असतो. तो माल मार्केट यार्डात दाखल होत आहे. शेतकऱ्यांना बाजार समितीने थेट विक्रीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शेतकऱ्यांकडून कोणतेही शुल्क आकारण्यात येत नसल्याने मोठी आवक झाल्याचे बाजार समिती प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. मंगळवारी रात्री आणखी आवक होईल, असा अंदाज बाजार समितीकडून व्यक्त करण्यात आला.

फुलांचा प्रकार आवक (किलोत) भाव (किलोत)
झेंडू 2,72,000 40 ते 80
तुळजापूरी झेंडू 6200 80 ते 140
गुलछडी 6400 300 ते 400
बिजली 2000 100 ते 150
शेवंती 26,400 100 ते 170