भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील निर्णायक कसोटीच्या तिसर्‍या दिवशी झाले ‘हे’ चार विक्रम

केपटाऊन : भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यात न्यूलँड्स पार्क मैदानावर सुरु असलेल्या निर्णायक तिसर्‍या कसोटी सामन्याच्या तिसर्‍या दिवशी दोन्ही संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत अनेक विक्रमांना गवसणी घातली. यामध्ये भारताचा कर्णधार विराट कोहली आणि यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंत तर दक्षिण आफ्रिकेकडून मार्को यान्सेन आणि कागिसो रबाडा यांचा समावेश आहे.

1) विराट कोहली :

भारताचा कर्णधार विराट कोहलीने या सामन्यात भारताच्या दुसर्‍या डावात 29 धावांची खेळी करत सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 500 डावांत सर्वाधिक 23358 धावांचा टप्पा गाठला. यापूर्वी 500 डावांमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या नावे होता. सचिनने सर्व प्रकारच्या क्रिकेटमध्ये 500 डावांत 22214 धावा केल्या होत्या.

2) ऋषभ पंत :

या सामन्यात भारताच्या दुसर्‍या डावात आघाडीचे फलंदाज स्वस्तात बाद होत असताना विराट कोहलीच्या साथीने ऋषभ पंतने भारताचा डाव सावरत अर्धशतकी खेळी केली. पंतचे हे अर्धशतक आशिया खंडाबाहेरील 6वे अर्धशतक होते. त्यामुळे पंत 25 वय होण्यापूर्वी आशिया खंडाबाहेर 6 अर्धशतके करणारा पहिला खेळाडू ठरला आहे.

3) मार्को यान्सेन :

21 वर्षीय मार्को यान्सेन, पदार्पणाच्या कसोटी मालिकेत दक्षिण आफ्रिकेकडून सर्वाधिक बळी घेणारा गोलंदाज ठरला आहे. या उंच वेगवान गोलंदाजाने मालिकेत आतापर्यंत 17 फलंदाज बाद केले आहेत. यापूर्वी हा विक्रम दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार शॉन पोलॉकच्या नावावर होता. पोलॉकने 1995-96 मध्ये दक्षिण आफ्रिकेकडून इंग्लंडविरुद्ध पदार्पण करताना एकूण 16 बळी घेतले होते.

4) कागिसो रबाडा :

दक्षिण आफ्रिकेचा प्रमुख गोलंदाज कागिसो रबाडाने या तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत त्याच्या संघासाठी महत्वपूर्ण कामगिरी केली आहे. असे असले तरी या दरम्यान रबाडाच्या नावे एक लाजिरवाणा विक्रम जमा झाला आहे. या मालिकेतील तीन सामन्यांत रबाडाने 40 पेक्षा जास्त नो बॉल टाकले आहे. त्यामुळे तो दक्षिण आफ्रिकेकडून एका कसोटी मालिकेत सर्वाधिक नो बॉल टाकणारा गोलंदाज झाला.

यापूर्वी हा विक्रम माजी वेगवान वेगवान डेल स्टेनच्या नावावर होता, त्याने 2004-05 मध्ये इंग्लंडविरुद्धच्या 3 कसोटी सामन्यांमध्ये 34 नो-बॉल टाकले होते, ही त्याची पदार्पण मालिका देखील होती.