संतकृपा शिक्षण संस्थेकडून मुख्यमंत्री निधीस दीड लाखाची मदत

कराड (प्रतिनिधी) -घोगांव ता. कराड येथील श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्यावतीने व येथील कर्मचाऱ्यांच्या वतीने मिळून 1 लाख 51 हजार रुपयांची मदत मुख्यमंत्री सहाय्यता निधी करिता देण्यात आली. देशावर करोनासारख्या महाभयानक संसर्गाचे संकट आहे. महाराष्ट्रात या संकटाची छाया गडद होत चालली आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री सहाय्यता निधीस आर्थिक सहकार्य करण्याचे आवाहन केले होते. या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी म्हणून घोगावच्या श्री संतकृपा शिक्षण संस्थेच्या व्यवस्थापनाने 1 लाख रुपये व संस्थेतील काम करणाऱ्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सुमारे 51 हजार रूपयांचा निधी जमा केला. हा निधी संस्थेच्या संचालकांकडे तात्काळ सुपूर्त करण्यात आला. मुख्यमंत्र्याच्या या आवाहनाला प्रतिसाद देत 1 लाख 51 हजार रुपयांचा धनादेश संस्थेचे सचिव प्रसून जोहरी यांनी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस दिला. श्री संतकृपा शिक्षण संस्था सदैव सामाजिक बांधिलकी जपत आली आहे. ग्रामीण भागातील गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शुल्कात सवलत व इतर अनेक सवलती देऊन ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी उच्च शिक्षणाची दारे खुली केली आहेत. करोनाच्या या लढ्यासाठी व राज्यावरील या संकटमय काळात संस्थेच्यावतीने व संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने केलेली मदत खरोखर कौतुकास्पद आहे. संस्थेचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांचे या सामाजिक बांधिलकीचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

Leave a Comment