पारगावच्या ग्रामसेवकासह एकाला लाच घेताना अटक

सातारा (प्रतिनिधी)- विहरीच्या कामात मदत करण्यासाठी व गटारांचे काम करताना ठेवलेली अनामत रक्कम परत मिळवून देण्यासाठी 60 हजार रुपयांची लाच घेताना पारगाव (ता. खंडाळा) येथील ग्रामसेवक भाऊसाहेब गजानन सस्ते व आंबादास रामराव जोळदापके (रा. नांदेड सिटी,पुणे) या व्यक्तीला अटक करण्यात आली असून खंडाळा पंचायत समितीचा शाखा अभियंता भोसले फरार झाला आहे.

याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, यातील तक्रारदार यांना सरकारी अनुदानातून विहीर मिळाली होती. तिचे काम कराताना मदत करण्यासाठी व पारगाव येथील बंदिस्त गटाराचे काम करताना अनामत म्हणून ठेवलेले पैसे परत देण्यासाठी ग्रामसेवक सस्ते व इतर दोन संशयित एकूण बिलाच्या दहा टक्के म्हणजे साठ हजार रुपये लाच म्हणून मागत होते. याबाबत तक्रारदाराने सातारा एसीबीकडे तक्रार दिली होती.

तक्रार मिळाल्यानंतर एसीबीच्या पथकाने बुधवारी रात्री जिल्हा परिषदेच्या गेटसमोर सापळा लावला होता. यावेळी संशयित लाच मागत असल्याची खात्री झाल्यानंतर एसीबीने त्यांना पकडले परंतू खंडाळा पंचायत समितीचा शाखा अभियंता भोसले हा अंधाराचा फायदा घेत पळून गेल्याचे एसीबीकडून सांगण्यात आले. संशयितांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास एसीबीचे पोलीस उपाधीक्षक अशोक  शिर्के करत आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक राजेश बनसोडे ( एसीबी), अप्पर अधीक्षक सुषमा चव्हाण ( एसीबी), उपाधीक्षक अशोक शिर्के यांच्या मार्गदर्शनाखाली लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली.

Leave a Comment