Lok Sabha Election 2024 : ‘एक देश, एक नेता हे मोदींचे मिशन’; अरविंद केजरीवालांचा हल्लाबोल

नवी दिल्ली  – तुरूंगाबाहेर आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. देशात हुकूमशाही लादण्यासाठी मोदींनी एक देश, एक नेता या मिशनवर काम सुरू केले आहे. त्यांना सर्व नेते संपवायचे आहेत, असा आरोप केजरीवाल यांनी केला.

सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केल्याने केजरीवाल शुक्रवारी ५० दिवसांनंतर तुरूंगाबाहेर आले. त्यानंतर शनिवारी दिल्लीतील आपच्या मुख्यालयात आयोजित मेळाव्यात त्यांनी घणाघाती भाषण केले. मोदींनी दोन पातळ्यांवर खतरनाक मिशन हाती घेतले आहे. त्यामागे विरोधी पक्षांच्या नेत्यांना तुरूंगात धाडणे आणि भाजपच्या नेत्यांना राजकीयदृष्ट्या संपवणे असा उद्देश आहे.

यावेळची निवडणूक भाजपने जिंकल्यास विरोधी गोटातील उद्धव ठाकरे, ममता बॅनर्जी, तेजस्वी यादव, एम.के.स्टॅलिन, पिनरयी विजयन आदी नेते तुरूंगात जातील. भाजपचे नेतेही मोदींच्या तावडीतून सुटणार नाहीत. लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी यांसारख्या ज्येष्ठ नेत्यांना याआधीच निवृत्त करण्यात आले.

शिवराजसिंह चौहान, वसुंधरा राजे आदींचे राजकारण संपवण्यात आले. पुढचा नंबर उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा आहे. भाजप जिंकल्यास उत्तरप्रदेशात मुख्यमंत्री बदल होईल, असा दावा त्यांनी केला.

इंडिया आघाडीचा पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण असा प्रश्‍न भाजपकडून विचारला जातो. मी उलट प्रश्‍न विचारतो, भाजपचा पंतप्रधान कोण असेल? मोदींनी वयाच्या पंचाहत्तरीनंतर राजकीय निवृत्तीचा नियम बनवला आहे. ते स्वत: पुढील वर्षी वयाची पंचाहत्तरी पूर्ण करतील. त्यामुळे ते निवृत्त होतील. साहजिकच, ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पंतप्रधान बनवण्यासाठी मतं मागत आहेत, असे केजरीवाल म्हणाले.

अर्थात, केंद्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. तुरूंगातून सुटका झाल्यानंतर मी अनेक निवडणूक तज्ञांशी आणि नागरिकांशी बोललो. त्यातून भाजपचे सरकार पुन्हा येणार नसल्याचे स्पष्टपणे जाणवले. केंद्रात नवे सरकार येईल. आप त्याचा भाग असेल, असे भाकीत त्यांनी केले.

ईडीने अटक केल्यानंतर केजरीवाल यांच्या राजीनाम्याची मागणी भाजपने लावून धरली. मात्र, केजरीवाल यांनी राजीनामा दिला नाही. त्याविषयी भूमिका मांडताना ते म्हणाले, माझ्यासाठी मुख्यमंत्रिपद महत्वाचे नाही. बनावट प्रकरणात मला राजीनामा देण्यास भाग पाडण्यासाठी कारस्थान रचण्यात आले. त्यामुळे मी राजीनामा दिला नाही.