तिरुमला देवस्थान वाटणार एक लाख लाडू ! ‘रामायण‘ मालिकेतील कलाकारही राहणार उपस्थित

नवी दिल्ली – येत्या २२ जानेवारीला अयोध्येत राम मंदिरामध्ये रामलल्लाच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा आणि भव्य अभिषेक होणार आहे. या उत्सवात, सर्व पाहुणे आणि त्यात सहभागी होणार्‍या भक्तांना आंध्र प्रदेशातील तिरुपती येथील तिरुमला तिरुपती देवस्थान भगवान व्यंकटेश्वराला अर्पण केला जाणार प्रसिद्ध प्रसाद ‘श्रीवरी लाडू’ वाटणार आहे. त्यासाठी एक लाख लाडू अयोध्येला पाठवण्यात येणार आहेत.

जगप्रसिद्ध भगवान व्यंकटेश्वर मंदिराचे कामकाज सांभाळत असलेले तिरुमला तिरुपती देवस्थानम्स यांनी राम मंदिर उद्घाटन सोहळ्यादरम्यान एक लाख ‘श्रीवरी लाडू’ प्रसादाचे वाटप करण्याची घोषणा केली आहे.

मंदिर ट्रस्ट, श्री रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्राच्या निमंत्रित यादीमध्ये सात हजारांहून अधिक लोक आहेत. यामध्ये राजकीय नेते, बॉलिवूड सेलिब्रिटी, क्रिकेटर्स, उद्योगपती आणिटानेक मान्यवरांचा समावेश आहे. तिरुमला येथे पत्रकार परिषदेला संबोधित करताना, टीटीडीचे कार्यकारी अधिकारी एव्ही धर्मा रेड्डी म्हणाले, ‘आम्ही अयोध्या कार्यक्रमात भाविक आणि व्हीव्हीआयपींना सदिच्छा म्हणून एक लाख लाडू वितरित करण्याचा निर्णय घेतला आहे.

अभिषेक सोहळा हा सनातन धर्माच्या सर्व अनुयायांसाठी ऐतिहासिक क्षण आहे. देवस्थानचे प्राथमिक उद्दिष्ट हिंदू धर्म, संस्कृती आणि मूल्यांचा प्रसार करणे हे असल्याने, रामजन्मभूमी पूजेमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाल्याचा आम्हाला सन्मान वाटतो. दरम्यान, भव्य अभिषेक सोहळ्याची निमंत्रण पत्रिका पाहुण्यांना पाठवण्यात येत आहेत. पाहुण्यांच्या यादीत अनेक ऋषीमुनी आणि काही परदेशी निमंत्रितांचाही समावेश आहे.

प्रसिद्ध टीव्ही कलाकारही येणार
याशिवाय प्रसिद्ध टीव्ही मालिका ‘रामायण’मध्ये भगवान राम आणि देवी सीता यांच्या भूमिका साकारणारे अभिनेता अरुण गोविल आणि दीपिका चिखलिया यांनाही या कार्यक्रमासाठी आमंत्रित करण्यात आले आहे. पारंपारिक नागर शैलीत बांधलेल्या राम मंदिर संकुलाची लांबी ३८० फूट (पूर्व-पश्चिम दिशा), रुंदी २५० फूट आणि उंची १६१ फूट असेल. मंदिराच्या संरचनेत प्रत्येकी २० फूट उंचीचे मजले असतील, ज्यात३९२ खांब आणि ४४ दरवाजे असतील.