नगर | नगरमध्ये एक लाख एकल महिला

नगर, (प्रतिनिधी)- जिल्हा परिषदेने जिल्ह्यातील एकल महिलांना विविध कल्याणकारी योजना देण्यासाठी ग्रामपंचायत व अंगणवाडीमार्फत गावपातळीवर एकल महिलांचे सर्वेक्षण केले. त्यात तब्बल एक लाख ७२६ महिला आढळल्या. जिल्ह्यातील एकल महिलांचा इतक्या नियोजनबद्ध पद्धतीने सर्वेक्षण करणारा अहमदनगर हा राज्यातील पहिला जिल्हा ठरला आहे.

यावर कृतिआराखडा राबविण्यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ व मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी काल बैठक घेतली. त्यात पुनर्वसन कार्यक्रमाची रूपरेषा तयार केली. लवकरच कृतिआराखडा जाहीर करण्यात येणार आहे.

मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी पुढाकार घेऊन सर्व ग्रामपंचायतींना गावातील विधवा, घटस्फोटित व परित्यक्ता, तसेच स्वेच्छेने अविवाहित राहिलेल्या महिलांच्या सर्वेक्षणाचे आदेश दिले .जिल्ह्याच्या ग्रामीण भागात विधवा घटस्फोटित, परित्यक्ता महिलांची इतकी मोठी संख्या यानिमित्ताने प्रथमच एकत्रित प्रशासनास आढळली. त्यामुळे त्यांच्यासाठी आर्थिक तरतूद करून विविध योजना राबवणे शक्य होईल.

या सर्वेक्षणाच्या आधारे ८ मे रोजी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या अध्यक्षतेखाली मुख्य कार्यकारी अधिकारी येरेकर यांनी विविध विभागांचे अधिकारी व एकल महिलांसाठी काम करणाऱ्या साऊ एकल समितीचे कार्यकर्ते, महिला स्वयंरोजगारासाठी काम करणाऱ्या संस्था अशी एकत्रित बैठक आयोजित केली होती. त्यात या महिलांच्या पुनर्वसनासाठी कृतिकार्यक्रम व प्रकल्प करण्याचे ठरवले.

विविध योजनांसाठी पात्रता पाहणी सर्व्हे करण्याचे व त्याआधारे विविध शासकीय योजनांचा लाभ देण्याचे ठरवण्यात आले. विविध योजनांमध्ये एकल महिलांना प्राधान्यक्रम देण्याविषयी चर्चा झाली.

या बैठकीला साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक हेरंब कुलकर्णी, जिल्हा अध्यक्ष अशोक कुटे, मिलिंदकुमार साळवे, कारभारी गरड, नवनाथ नेहे, बाळासाहेब जपे, प्रतिमा कुलकर्णी, रेणुका चौधरी, नीतेश बनसोडे हे उपस्थित होते.महिला दिनाला एकल महिलांच्या सभा आयोजित करणारा नगर हा पहिला जिल्हा आहे. या बैठकीत एकल महिलांचे प्रश्न गावाने समजून घेतले. त्या महिलांना कोणत्या शासकीय योजना देणे शक्य आहे याविषयी चर्चा केली.

८७ हजार २८७ विधवा महिला
ग्रामविकास अधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांच्या मदतीने गावातील अशा महिलांची माहिती जमवली. त्यानुसार नगर जिल्ह्यातील ग्रामपंचायत क्षेत्रात ८७ हजार २८७ विधवा महिला, ५ हजार ६४९ घटस्फोटीत, ६ हजार ४९२ परित्यक्ता, १ हजार २९८ अविवाहित महिला आहेत. एकूण १ लाख ७२६ एकल महिलांची संख्या आहे.

सर्वाधिक संख्या संगमनेरात
विधवा महिलांची सर्वांत मोठी संख्या संगमनेर- ९ हजार ८१८, राहाता- ८ हजार ७५४, नेवासा- ९ हजार ५६३, व पारनेर-९ हजार ४०, या तालुक्यात आहे. घटस्फोटीत महिलांची सर्वात जास्त संख्या अकोले- १ हजार ७८७ व शेवगाव- १ हजार २६८ तालुक्यात आहे. परित्यक्ता महिलांची संख्या अकोल- १ हजार ६१२. शेवगाव- ९७६ व संगमनेर- ८३९ तालुक्यांत जास्त असल्याचे आकडेवारीमध्ये समोर आले आहे.