पिंपरी | दूध अनुदान योजनेला महिन्याची मुदतवाढ

वडगाव, (वार्ताहर) – मावळ तुलाक्यात शेतीला जोडधंदा म्हणून दूध व्यवसाय केला जातो. राज्यातील सहकारी संघ व खासगी दूध प्रकल्पांना पुरवठा करणार्‍या उत्पादकांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेची मुदत एक महिन्याने वाढविण्याचा निर्णय शासनाने घेतला असून, शेतकर्‍यांना दिलासा मिळाला आहे.

दूध प्रकल्पांना पुरवठा करणार्‍या उत्पादकांना दुधासाठी प्रतिलिटर पाच रुपये अनुदान देण्याच्या योजनेची मुदत देण्याचे जाहीर केल्याने ११ फेब्रुवारी ते १० मार्च २०२४ या काळासाठी शेतकर्‍यांना प्रतिलिटरला पाच रुपये अनुदान मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दूध अनुदान योजना प्रथम ११ जानेवारी ते १० फेब्रुवारी या कालावधीसाठी राबविण्यात आली. त्यासाठी राज्य सरकारकडून २८० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पहिल्या टप्प्यातील अनुदान निधी दुग्ध आयुक्तालयाकडे उपलब्ध झाला आहे. त्यामध्ये संपूर्ण माहितीसह परिपूर्ण प्रस्ताव प्राप्त दूध संघांच्या शेतकर्‍यांच्या थेट बँक खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाल्याचे दुग्धव्यवसाय विकास आयुक्तालयाने गेल्याच आठवड्यात स्पष्ट केले आहे. एक महिन्याने पुन्हा मुदत वाढवून दिल्याने दूध उत्पादकांना दिलासा मिळाला आहे. त्यासाठी राज्य सरकारने २३० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देणार असल्याचे स्पष्ट केले आहे.