ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम

पुणे – ऑनलाइन फसवणुकीचे सत्र कायम असून वेगवेगळ्या घटनांमध्ये चोरट्यांनी महिलांना 6 लाख रुपयांचा गंडा घातला.
याबाबत येरवडा भागातील एका महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली. तक्रारदार महिलेच्या मोबाइल क्रमांकावर अज्ञाताने काही महिन्यांपूर्वी संपर्क साधला होता. परदेशात एका बड्या कंपनीत मनुष्यबळ विकास अधिकारी म्हणून नोकरीची संधी असल्याची बतावणी अज्ञाताने केली होती. त्यानंतर महिलेला परदेशातील नोकरीसाठी काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागेल, असे सांगितले.
महिलेला एका बॅंक खात्यात पैसे भरण्यास सांगितले. महिलेने खातरजमा न करता वेळोवेळी 5 लाख 11 हजार रुपये जमा केले. त्यानंतर महिलेने अज्ञाताच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा तो बंद असल्याचे निदर्शनास आले. फसवणूक झाल्याचे निदर्शनास आल्यावर महिलेने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. गुन्हे शाखेतील पोलीस निरीक्षक अजय वाघमारे तपास करत आहेत.
दरम्यान, विमाननगर भागातील एका महिलेकडे सीमकार्ड अद्ययावतची बतावणी करून चोरट्याने तिच्या बॅंक खात्यातून 1 लाख 11 हजार रुपये लांबविले. पंधरा दिवसांपूर्वी अज्ञाताने महिलेच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. एका मोबाइल कंपनीतून बोलत असून सीमकार्ड अद्ययावत करण्याचे काम सुरू आहे. सीमकार्ड अद्ययावत न केल्यास मोबाइल बंद पडेल, अशी बतावणी केली.
महिलेचा मोबाइल क्रमांक बॅंक खात्याला जोडलेला असल्याने चोरट्याने महिलेला एक ऍप डाऊनलोड करण्यास सांगितले. त्यानंतर महिलेच्या बॅंक खात्यातून चोरट्याने 1 लाख 30 हजार 137 रुपये लांबविले.

Leave a Comment