पुणे | चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – चारधामला दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या संख्येमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली असून, भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे तेथील सर्व प्रकारच्या व्यवस्थेवर ताण येत असून, याचा त्रास भाविकांना होत असल्याचे स्थानिक प्रशासनाला आढळून आले आहे.

भाविकांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर चारधाम येथील भाविकांच्या दर्शनाची प्रक्रिया सुरळीत पार पाडावी आणि त्यांना कोणत्याही गैरसोयींचा सामना करावा लागू नये, यासाठी उत्तराखंड शासनाने धाम यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांसाठी ऑनलाइन नोंदणीची प्रक्रिया सुरू केली आहे. दर्शनासाठी नोंदणी करणे अनिवार्य आहे, अशी माहिती उत्तराखंड प्रशासनाने दिली आहे.

भाविकांनी https://registrationandtouristcare.uk.gov.in/ या संकेतस्थळावर पूर्वनोंदणी करावी. ज्या तारखेसाठी भक्तांनी नोंदणी केली आहे, त्या तारखेलाच भक्तांना चारधाम दर्शनाची परवानगी असेल, याची भाविकांनी नोंद घ्यावी, असे उत्तराखंड प्रशासनाकडून सांगण्यात आले. वृद्ध आणि आजारी असलेल्या भाविकांनी त्यांची यात्रा सुरू करण्यापूर्वी त्यांनी स्वतःची वैद्यकीय तपासणी करून घ्यावी.

यासंदर्भात उत्तराखंड शासनाच्या वैद्यकीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण विभागाने मार्गदर्शक सूचना निर्गमित केल्या असून, त्या https://health.uk.gov.in/pages/display/140-char-dham-yatra-health-advisory या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. यात्रेकरूंनी या सूचनांचे पालन करावे आणि प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन उत्तराखंड प्रशासनाने केले आहे.