“भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल”

भुवनेश्‍वर – बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे बिगर भाजप आणि बिगर कॉंग्रेस पर्यायांबाबत बोलतात. पण, भाजपच्या पराभवासाठी विरोधकांना एकत्र यावे लागेल हे त्यांनी ध्यानात घ्यावे. कॉंग्रेसशी हातमिळवणी केल्याशिवाय भाजपचा पराभव शक्‍य नाही, असा संदेश मंगळवारी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या निकटच्या सहकाऱ्याने दिला.

जेडीयूचे नेते आणि नितीश यांचे सहकारी के.सी.त्यागी यांनी ओडिशात राजद, सपच्या नेत्यांसमवेत पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपच्या विरोधात लढण्यासाठी विरोधकांनी एकत्र येण्याच्या भूमिकेवर जोर दिला. त्यांनी ओडिशाचे मुख्यमंत्री नवीन पटनाईक यांनाही विरोधकांच्या संभाव्य आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले. विरोधकांना एकत्र आणण्यासाठी नितीश प्रयत्नशील आहेत. त्या प्रयत्नांना पटनाईक यांनी प्रतिसाद द्यावा.

पटनाईक यांनी आता तटस्थता संपवण्याची वेळ आली आहे, असे त्यागी म्हणाले. एकत्र येण्याची भूमिका बहुतांश विरोधी पक्षांनी घेतली आहे. मात्र, ममता आणि केसीआर कॉंग्रेसशी जुळवून घेण्याबाबत काहीसे अनुत्सूक आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर, नितीश यांच्या जेडीयूने कॉंग्रेस अविभाज्य घटक असणाऱ्या विरोधकांच्या आघाडीची संकल्पना पुढे केली आहे.