शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोधकांचे राजकारण – पंतप्रधान

नवी दिल्ली – देशातील विरोधी पक्ष हे आता शेतकऱ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करीत आहेत. त्यांनी नेहमीच शेतकऱ्यांबरोबर खोटेपणाचा व्यवहार केला आहे, असा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते.

शेतकऱ्यांना सक्षम करण्यासाठीच केंद्र सरकारने ही तीन विधेयके आणली असून भाजप कार्यकर्त्यांनी स्थानिक पातळीवर शेतकऱ्यांशी संवाद साधून त्यांना या विधेयकांतील तरतुदींची माहिती द्यावी, असे आवाहन मोदींनी केले.

ते म्हणाले की, आपण गावपातळीपासून शेतकऱ्यांना या तरतुदींविषयी माहिती देत गेलो तर यावरून ज्यांनी राजकारण करून शेतीविषयक सुधारणांविषयी लोकांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न चालवला आहे तो दूर होईल.

देशातील एकूण शेतकऱ्यांपैकी 85 टक्के शेतकरी हे छोटे आणि मध्यम शेतकरी आहेत. त्यांना या नवीन कायद्यांची चांगलीच मदत मिळेल. त्यांना त्यांची शेती उत्पादने बाजार समित्यांमध्ये नेऊन विकण्याची आता गरज नाही, ते आता आपला माल कोठेही नेऊन विकू शकतील आणि त्याचा त्यांना चांगला लाभ होईल.

ज्यांनी शेतकरी आणि कामगारांना कायम खोटी आश्‍वासने दिली त्यांनी आता त्यांच्याच खांद्यावर बंदूक ठेवून सरकारच्या विरोधात वातावरण तापवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे, असा आरोपही त्यांनी केला.

Leave a Comment